धोकादायक घराचा वापर बंद करा; खारघर-तळोजामधील 150 इमारतींना पालिकेची नोटीस

गजानन चव्हाण
Wednesday, 16 September 2020

खारघर आणि तळोजा परिसरातील 150 हून अधिक धोकादायक इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असून, या इमारती केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहे.

खारघर : खारघर आणि तळोजा परिसरातील 150 हून अधिक धोकादायक इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असून, या इमारती केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या घरांचा त्वरित वापर बंद करावा, अशी सूचना देत इमारती सुस्थितीत असल्याबाबतचा स्ट्रक्चर ऑडिट अहवाल तीन दिवसांत पालिकेकडे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मोठ्या दूर्घटनेनंतर महाड नगरपालिकेला आली जाग! शहरातील 304 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळल्याने निष्पाप नागरिकांचे बळी गेले. अशी दुर्घटना पनवेल पालिका हद्दीत होऊ नये, म्हणून प्रशासनाने 10 वर्षांपूर्वी सिडकोने उभारलेल्या इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत. यात प्रामुख्याने खारघर सेक्टर 16 येथील वास्तुविहारमधील केएच दोन मधील 10 इमारती,  सेक्टर 17 मधील केएच  चार सेलिब्रेशन सोसायटीमधील 19 इमारती आणि परिसरातील गाव; तसेच तळोजा वसाहत आणि गाव अशा जवळपास 150हून अधिक धोकादायक इमारतींचा समावेश आहे. या घरांचा त्वरित वापर बंद करावा आणि  इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पालिकेकडे त्याचा अहवाल सादर करावा, अशा प्रकारची नोटीस पाठवल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 

 

खारघर आणि तळोजा वसाहतीमधील दीडशेहून अधिक धोकादायक इमारतीला नोटीस दिली आहे. तीन दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
- दशरथ भंडारी, प्रभाग अधिकारी खारघर, तळोजा

 

वास्तुविहार आणि सेलिब्रेशन या दोन इमारतींची देखभाल सध्या सिडको करत आहे. मागील वर्षी सिडकोकडे पाठपुरावा करून काही इमारतींची डागडुजी करून घेतली.  या इमारती धोकादायक असल्याने त्यांच्या जीवितास धोका असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 
- संजना समीर कदम,
स्थानिक नगरसेविका

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal notice to 150 buildings in Kharghar Taloja