
शनिवारी ठाणे महापालिकेने काढलेल्या एका परिपत्रकात पालिका कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यालय हे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत.
ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्वच शाळा-महाविद्यालये हे 16 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यातच अद्यापही सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा शिक्षण विभागासह पालिकेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यानुसार शनिवारी ठाणे महापालिकेने काढलेल्या एका परिपत्रकात पालिका कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यालय हे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच आदेशाच्या अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यापासून ठाणे महापालिकेतील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवून ते सुरू करण्याबाबत 31 डिसेंबर 2020 ला आलेल्या शासन आदेशानुसार 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मधल्या काळात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात जरी कोरोना नियंत्रणात आला असला. तरी विदेशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्याचा विचार करता सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय नवीन आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक महापालिका मुख्यालय उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शनिवारी सायंकाळी काढले. तसे निर्देश शाळा आणि महाविद्यालय यांना देण्यातही आले आहे. परिणामी तूर्तास तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आणखीन काही दिवस बंदच राहणार आहेत.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे येत्या 16 जानेवारी नंतर जिल्ह्यात शाळा सुरू होणार की बंद राहणार याबाबत कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे शाळा प्रशासनासह पालक वर्ग देखील संभ्रमात पडले आहेत.
जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यांच्याकडून परवानगी प्राप्त होताच, शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला देण्यात येतील.
- शेषराव बढे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. ठाणे.
Municipal schools in Thane district closed till further orders
--------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )