Special Report | बंद घरांतील लाखभर लोकांची शोधमोहीम; कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची विशेष पथके 

Special Report | बंद घरांतील लाखभर लोकांची शोधमोहीम; कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची विशेष पथके 

मुंबई : लॉकडाऊनपासून मुंबईत 20 हजार घरे बंद असून, अनलॉकनंतरही घरांतील रहिवासी परतलेले नाहीत. या बंद घरांतील रहिवासी आता आपल्या घराकडे परतू लागले आहेत; मात्र अशा रहिवाशांमुळे कोव्हिड संसर्ग पसरण्याची शक्‍यता असल्याने बंद घरातील एक लाख रहिवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी विभागनिहाय डॉक्‍टरांच्या विशेष पथकांची स्थापना केली असून, येत्या 15 दिवसांत ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

लॉकडाऊनदरम्यान मुंबईतून 50 लाखांच्या आसपास रहिवासी मुंबई बाहेर गेल्याचे सांगितले जाते. अनलॉक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हे रहिवासी आपल्या घराकडे परतले. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेदरम्यान या रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली; मात्र या दरम्यान मुंबईतील 20 हजार घरे बंद असल्याचे समोर आले आहे. अनलॉकनंतरही या घरांतील रहिवासी परतलेले नाहीत. या घरांतील एक लाख लोकांचा शोध घेण्यास आता पालिकेने सुरुवात केली आहे. 
पालिकेने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी'द्वारे 33 लाख घरांतील एक कोटीपेक्षा अधिक रहिवाशांची तपासणी केली. यानंतर जे रहिवासी मुंबईत परतले त्यांच्यासाठी पालिकेने या अभियानाचा दुसरा टप्पा राबवून त्यांची तपासणी केली. अभियानाच्या दोन्ही टप्प्यानंतरही मुंबईतील 20 हजार घरांतील रहिवासी परतले नसल्याचे समोर आले. बंद घरांपैकी 12 हजार घरे ही झोपडपट्टी परिसरातील आहेत, तर उर्वरित आठ हजार घरे ही इमारतींमधील आहेत. त्यातील झोपडपट्टी परिसरात 60 हजार तर इमारतींमधील 40 हजार रहिवाशांचा पालिका पुन्हा शोध घेणार आहे. 

या रहिवाशांचा शोध घेण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयानुसार विशेष पथकांची स्थापना केली आहे. ही पथके पुन्हा एकदा या बंद घरांना भेटी देऊन त्यांचे सर्वेक्षण करणार आहेत. या घरांमध्ये परतलेल्या रहिवाशांची नव्याने नोंद केली जाणार आहे. डॉक्‍टरांचे विशेष पथक तसेच मोबाईल चाचणी केंद्रांच्या मदतीने प्रत्येक विभाग कार्यालयात या रहिवाशांची तपासणी होणार आहे. जे रहिवासी बाधित राज्य किंवा देश तसेच ज्यांना काही लक्षणे जाणवत असतील अशा रहिवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यासाठी मुंबईतील सर्व विभाग कार्यालयांतील सहायक आयुक्तांची येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन त्यांना आवश्‍यक ते निर्देश दिले जाणार आहेत. 

स्वयंसेवकांची नेमणूक 
महापालिकेच्या स्वयंसेवकांचा चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेणार आहे. यामध्ये वय, लिंग, पूर्वीच्या वास्तव्याचे ठिकाण यासह मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायू पातळीही नोंदवून घेण्यात येणार आहे. त्यासह दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींची वेगळी नोंद केली जाणार आहे. बाधित ठिकाणाहून आलेल्या व्यक्ती तसेच लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाईल. 

मुंबईत दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पालिका आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. पालिकेने दिवाळीनंतर पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्याशिवाय प्रत्येक विभागात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिक तेथे आपली मोफत तपासणी करून घेऊ शकतात. या दरम्यान आम्हाला मुंबईतील 20 हजार घरे बंद असल्याचे आढळले आहे. त्यातील एक लाख लोकांचा शोध घेण्याचे निर्देश मी दिले आहेत. या सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, पालिका 

Municipal Special Squads to Prevent Covid Infection

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com