
Mumbai crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर हातोडीने हल्ला करून हत्या; आरोपी पती अटकेत
मुंबई : चारित्र्यावर संशयामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडी मारून तिची हत्या केल्याचा गंभीर गुन्हा रविवारी रात्री शिवडी परिसरात घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपी पतीला तत्काळ अटक केली. चारित्र्यावरील संशय व पत्नीशी झालेल्या भांडणातून हत्या असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
नजराणा खातून शेख असे मृत महिलेचे नाव असून. ती शिवडी येथील कौलाबंदर परिसरात पती अब्दुल सलीम मोहम्मद राहून शेख सोबत वास्तव्यास होती. आरोपी अब्दुल सलीम मोहम्मद राहून शेख हा व्यवसायाने वायरमन आहे. पत्नी नजराणा शेखचे परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता.
त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने पत्नीच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. त्यातच नजराणा रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. तिला जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी पती अब्दुल शेखला घटनास्थळावरून अटक केली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात आरोपी शेख विरोधात अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली हातोडी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.
डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.