किडनीच्या आजाराने संगीतकार वाजिद खान यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

 बाॅलीवूडची प्रसिद्ध लोकप्रिय जोडी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.

 

मुंबई ःहिंदी चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. इरफान खान, ऋषी कपूर, अभिनेता मोहित बघेल, गीतकार योगेश यांच्यापाठोपाठ  बाॅलीवूडची प्रसिद्ध लोकप्रिय जोडी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, भाऊ साजिद असा परिवार आहे. वाजिद यांच्या पार्थिवावर वर्सोवा येथील कब्रिस्तानमध्ये मोजक्याच आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

अनेक लोकप्रिय गाण्यांना साजिद - वाजिद या जोडीने संगीत दिले आहे. अभिनेता सलमान खानच्या कित्येक चित्रपटातील सुपरहिट गाण्यांना त्यांनीच संगीत साज चढविला आहे.  दबंग, दबंग २, दबंग ३ वीर, वाॅण्टेड, पार्टनर, रावडी राठोड, हाऊसफुल २ अशा कित्येक हंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आणि त्यांचे संगीत यशस्वी ठरले. कित्येक गायकांना त्यांनी संधी दिली. केवळ हिंदी चित्रपटच नाही तर छोट्या पडद्यावरही रिअॅलिटी शोमध्ये ते परीक्षक राहिले.

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

सारेगमप १२ व सारेगमप सिगिंग सुपरस्टार या शोचे ते परीक्षक होते. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत खाँ हे त्यांचे वडील होत. वाजिद खान यांना किडनीचा आणि हृदयविकाराचा त्रास होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांची तब्येत अधिक खालावली. रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा काही झाली नाही आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टी एका चांगल्या संगीतकाराला मुकला आहे, अशी श्रद्धांजली काहींनी वाहिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Musician Wajid Khan dies of kidney failure