esakal | मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!
sakal

बोलून बातमी शोधा

मटणाचा झाला भडका! अन्‌...; पाहा नेमकं काय घडलं

कोल्हापूर, वसईनंतर मटण भाववाढीचा मुद्दा रायगड जिल्ह्यात पेटण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात त्याचा प्रति किलो भाव ६०० रुपये आहे. गेल्या वर्षी मकर संक्रांतीपर्यंत हा भाव अवघा ५०० रुपये होता.

मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायगड : कोल्हापूर, वसईनंतर मटण भाववाढीचा मुद्दा रायगड जिल्ह्यात पेटण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात त्याचा प्रति किलो भाव ६०० रुपये आहे. गेल्या वर्षी मकर संक्रांतीपर्यंत हा भाव अवघा ५०० रुपये होता. दर महिन्याला १० ते २० रुपयांनी भाववाढ ही लूट असल्याची तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातील मटणप्रेमी व्यक्त करत आहेत. 

ही बातमी वाचली का? खासगी तेजसमुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात!

कोल्हापुरातील मटण खवय्यांनी आंदोलन करून प्रति किलो ६०० वरून त्याचा भाव ५२० रुपये  करून घेतला; तर पालघर जिल्ह्यातील वसईत या मटणाच्या भाववाढीविरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचीही ५२० रुपये भाव करण्याची मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यातही भाव कमी करावेत, अशी मागणी ग्राहक करीत आहेत. याबाबात मंगेश सरफळे या ग्राहकाने सांगितले की,  वर्षभरात मटणाच्या भावात जवळपास १०० रुपयांची वाढ झाली आहे. हा भाव सामान्य ग्राहकाला परवडणारे नाही. या वाढीवर नियंत्रण आवश्‍यक आहे. कोकणातील बहुतांश सण, उत्सव मटणाशिवाय पूर्ण होत नाहीत; मात्र त्याचा भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रथा-परंपरा मोडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या भाववाढीबाबत मटणविक्रेत्यांनी सांगितले की, बाजारात बोकडांची कमतरता आहे. त्यामुळे भाववाढ होत आहे. तसेच स्वस्त भावात विक्री होत असल्यास त्याची गुणवत्ता तपासण्याची आवश्‍यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही बातमी वाचली का? मुंबई ते ठाणे प्रवास अधिक वेगवान!

मटण महाग होण्याची कारणे 
- महाराष्ट्रातील शेळी-बाजारातून कर्नाटक , आंध्र प्रदेश इत्यादी परराज्यातील व्यपारी चढ्या भावाने बोकड खरेदी करीत असल्याने बोकडांचे भाव वाढले. या वर्षी पूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने  बोकड आजाराला बळी पडून दगावले. त्यामुळे टंचाई निर्माण होऊन भाव वाढले. 
- शेळीपालन खर्चिक असल्यामुळे आदिवासींनी या व्यवसायापासून दूर जाणे पसंत केले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात बोकड नाहीत .
- चर्मोद्योग थंडावला आहे. त्यामुळे पूर्वी एका बोकडाच्या चामड्याच्या २५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळायचा. आता ते चामडे फेकून द्यावे लागत आहे. त्याचाही परिणाम झाला आहे.
- सध्या बोकड  पुणे, नाशिक, सातारा, लोणंद या भागातून आणावे लागतात. त्यामुळे वाहतूकखर्च वाढतो. त्याचाही परिणाम भाववाढीवर होतो. 

सामान्य ग्राहकाला दिवसभर मेहनत केल्यास ३०० रुपये मजुरी मिळते;  मात्र मटण ६०० रुपये प्रति किलोने विकत घ्यावे लागत आहे. हे न परवडणारे आहे. भाववाढ संतापजनक आहे. 
- दिनकर अमृस्कर, ग्राहक

पूर्वी बोकडाच्या चामड्याचे पैसे मिळायचे ते बंद झाले आहेत. मजूर, दुकानाचे भाडे, बोकडांची वाहतूक सा सर्वच खर्च वाढत असल्याने भाव वाढत आहे.
- दीपक जांभळे, मटणविक्रेते, आंबेवाडी

बाजारभावापेक्षा स्वस्त मटण मिळत असेल, तर ग्राहकाने त्याची गुणवत्ता तपासण्याची आवश्‍यकता आहे. चांगल्या आणि निरोगी बोकडांना चांगला भाव असतो. त्यामुळे मटण महाग विकावे लागते.
- प्रशांत पलंगे, गुडलक मटण शॉप, कोलाड

रायगड जिल्ह्यातील अनेक मटण दुकाने अतिक्रमण करून उभी राहिली आहेत. विक्रेते पावती देत नाहीत. दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. त्यानंतरही भाववाढ संतापजनक आहे. त्यामुळे पाठपुरावा करणार आहे. 
- मंगेश माळी, उपाध्यक्ष, जनजागृती ग्राहक मंच, रायगड

loading image