राज्य सरकार विरोधात भाजपाचा डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा | mva government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Strike

राज्य सरकार विरोधात भाजपचा डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा

डोंबिवली : अपेक्षा या हिंदुत्वाच्या (Hinduism) आहेत, विकासाच्या आहेत त्यामुळे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मागण्या करत राहणार. तुटपुंज्या लोकांनी कितीही टिका केली तरी त्याला आम्ही जुमानणार नाही. महाविकास आघाडी (mva government) सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवल्याचा घणाघाती आरोप जन आक्रोश मोर्चा (people strike) वेळी आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी केला.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

घन कचरा कर रद्द, लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत भाजपने जनआक्रोश मोर्चा काढत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. पूर्वेतील दत्तनगर चौक ते इंदिरा चौकापर्यंत आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. एकीकडे सार्वजनिक सेवा सुविधांचा बट्ट्याबोळ झाला असून सार्वजनिक आरोग्य सुविधाही वाईट अवस्थेत आहे, एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वीज बिलांमध्येही भरमसाठ वाढ झाल्याचेही यावेळी भाजपतर्फे सांगण्यात आले. या सर्व मुद्द्यांचा आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले.

या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मंदार हळबे, भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनीषा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका कार्यकर्त्यांसह प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेना नगरसेवकाच्या पाठीशी भाजपा

मोहने येथे सेनेच्या माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केली आहे. याविषयी आमदार चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, माजी नगरसेवक कोट यांनी एक मंदिर वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जी भूमिका घेतली ती हिंदुत्व आणि मंदिर या दोघांसाठी फार महत्वाची आहे. हिंदुत्व मानणाऱ्या प्रत्येकाची ही भूमिका असेल. ते सेनेचे माजी नगरसेवक असले तरी भाजपाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.

loading image
go to top