माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीमः एका महिन्यांत 35 लाख घरांतील  १ कोटी नागरिकांचे सर्वेक्षण

भाग्यश्री भुवड
Friday, 16 October 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एका महिन्यात मुंबईतील एक कोटींहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. मुंबईतील 99 टक्के घरांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे.

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एका महिन्यात मुंबईतील एक कोटींहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. मुंबईतील 99 टक्के घरांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबईत माझे कुटुंब माझी जबाबदारी'मोहीमेतंर्गत एक महिन्यात म्हणजेच 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत 35  लाख 22 हजार 740 घरांतील 1 कोटी 4 लाख 46 हजार 749 नागरिकांचे सर्वेक्षण अर्थात तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 76 टक्के सर्वेक्षण झाल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 
 
‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे स्वयंसेवकांचे चमू घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहेत. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी नोंदवून घेत आहेत. त्याचबरोबर कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणाव्यात, याची माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रक देखील घरोघरी देण्यात येत आहे. 

अधिक वाचाः  मुंबईत आता रात्री 11.30 पर्यंत बार, हॉटेल्स सुरु राहणार

महापालिका क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आरोग्यसेविकांच्या 4110 तुकड्या 

मुंबईत 15 सप्टेंबरपासून सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेत ११,४९२  आरोग्य सेविका व स्वयंसेवक कार्यरत आहेत. या आरोग्यसेविका आणि स्वयंसेवकांचे ४११० तुकड्या बनवण्यात आल्या आहेत. या तुकड्या घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत आहेत.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

My family my responsibility campaign 1 crore citizens 35 lakh households month


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family my responsibility campaign 1 crore citizens 35 lakh households month