संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू; कुटूंबियांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

अनिश पाटील
Thursday, 17 September 2020

संशयीत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मुंबई  - संशयीत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबिय करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.

पनवेलकरांसाठी खूशखबर! पालिका उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी 

चेंबूर येथील माहुल गाव परिसरातून संशयीत म्हणून सोहेल ऊर्फ उस्मान शमसुद्दीन शेख(27) व तय्यब मन्सुर शेख(41) यांना ताब्यात घेण्यात आले होते. बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणारे बांग्लादेशी असल्याच्या संशयावरून एक अधिकारी व एक पोलिस शिपाई हे त्या दोघांना आरसीएफ पोलिस ठाण्यात मंगळवारी घेऊन गेले. त्यानंतर सोहेलला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यता आले. तेथून तो मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाउंड परिसरातील राहत्या घरी आला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबईतील 'हा' हायप्रोफाईल परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; एका महिन्यात तब्बल 'इतक्या' जणांना लागण

तेथे उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी सोहेलचा मृत्यू झाला. त्याला उच्च दाबाचा त्रास होता, त्यात पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. दुसरीकडे याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही आहेत. त्यात सर्व चित्रीकरण झाले असून सोहेलबाबतीत कोणतेही गैरवर्तन झालेले नाही. याबाबत अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस म्हणत आहेत. सोहेल खासगी टॅक्सी चालवून चरीतार्थ चालवत होता.त्याचे नुकतेच लग्न झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mysterious death of a young man detained in mumbai chembur