‘सेफ क्लाईंबिंग इनिशिएटिव्ह’ ने बसवले नवे बोल्ट्स

नागफणी सुळक्याची चढाई आता अधिक सुरक्षित
Nagfani Cone New bolts installed by Safe Climbing Initiative
Nagfani Cone New bolts installed by Safe Climbing Initiativesakal

मुंबई : देशभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळ्यातील नागफणीच्या सुळक्यावर गिर्यारोहकांची नेहमीच गर्दी असते. आव्हानात्मक असलेल्या या सुळक्यावर गिर्यारोहकांच्या सुरक्षेसाठी पुण्याच्या ‘सेफ क्लाईंबिंग इनिशिएटिव्ह’ने (एससीआय) जुने बोल्ट्स बदलून नुकतेच नवे बोल्ट्स बसवले. जवळपास ५० वर्षांची कालमर्यादा असलेल्या नव्या ‘महात्मा गांधी बोल्ट’मुळे गिर्यारोहकांची चढाई अधिक सुरक्षित झाली आहे.

निसर्गसौंदर्याने बहरलेल्या लोणावळ्यात पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. त्यातही जवळपास ८०० फूट उंच असलेल्या नागफणीच्या सुळक्याला रॉक क्लाईंबिंगसाठी गिर्यारोहकांकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते; मात्र अनेक वर्षांपासून वापरात असलेले सुळक्यावरील काही बोल्ट्स जुने झाले होते. त्यामुळे पुण्याची एनजीओ संस्था असलेल्या ‘एससीआय’ने पुढाकार घेत नुकतेच जुने बोल्ट्स बदलून दीर्घकाळ टिकणारे नवे बोल्ट्स बसवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील, नुवाझिश पटेल, अनिकेत पाटील, महेश गुडाला यांच्या टीमने १४ आणि १५ मे रोजी मोहीम यशस्वी केली.

एप्रिल १९८४ मध्ये अरुण सावंत, सतीश आंबेरकर, अभिजीत पाटील आणि इतर सदस्यांनी पहिल्यांदा नागफणीवर यशस्वी चढाई केली होती. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी रिंग बोल्ट बसवले होते. तेव्हापासून नागफणीचा सुळका गिर्यारोहकांसाठी आवडीचे ठिकाण ठरले; मात्र २००४ साली जर्मन गिर्यारोहक

निकोलस मेलेंडर नागफणीवर रॉक क्लाईंबिंगसाठी आले असताना त्यांना अनेक बोल्ट्स आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नसल्याचेही निदर्शनास आले. गिर्यारोहकांच्या सुरक्षेसाठी ते बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार २००६ साली एससीआयने सुळक्यावरील गंजलेले जुने रिंग बोल्ट्स बदलून नवे महात्मा गांधी बोल्ट्स बसवले; मात्र शेवटच्या ३०० फुटांतील काही आव्हानात्मक ठिकाणचे बोल्ट बदलवायचे राहिले होते.

डिसेंबर २०२१ मध्ये एससीआयने पुन्हा एकदा संपूर्ण ८०० फुटांची चढाई करत सर्व बोल्ट्सची तपासणी केली. त्यावेळी शेवटच्या दोन टप्प्यांतील जुन्या पद्धतीचे आठ बोल्ट्स गंजल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एससीआयच्या चार सदस्यांनी नियोजन करत १४ आणि १५ मे रोजी मोहीम राबवत जुने बोल्ट्स बदलून नवे ‘महात्मा गांधी बोल्ट्स' बसवले. या बोल्ट्सची कालमर्यादा जवळपास ५० वर्षांची असल्याने गिर्यारोहकांना आता सुरक्षितरित्या रॉक क्‍लाईंबिंग करता येणार असल्याचे ‘एससीआय’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

नव्या बोल्टला महात्मा गांधींचे नाव!

२००४ साली जर्मन गिर्यारोहक निकोलस मेलेंडरला यांना रॉक क्लाईंबिंग करताना नागफणीच्या सुळक्यावरील बोल्ट्स हे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे तर नाही, पण सुरक्षितदेखील नसल्याने निदर्शनास आले. त्यानंतर निकोलसने नागफणीवरील दगडांचे नमुने जर्मनीला सोबत नेले आणि संशोधन करून भारतीय हवामानात टिकणारे व्ही२ए स्टीलपासून बनवलेले नवे बोल्ट्स पाठवले. महात्मा गांधींविषयी असलेल्या आदरामुळे निकोलसने नव्या बोल्टला ‘महात्मा गांधी बोल्ट’ असे नाव दिले. ५० वर्षांची कालमर्यादा असलेले हे बोल्ट जवळपास तीन हजार किलो वजन पेलू शकते, अशी माहिती ‘एससीआय’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील यांनी दिली.

नवे बोल्ट कसे बसवतात?

  • सर्वप्रथम ज्याठिकाणी बोल्ट बसवायचा आहे, त्या दगडाची भौगोलिक रचना तपासली जाते. भेगा, ठिसूळ नसलेले ठिकाण बोल्टिंगसाठी निवडले जाते.

  • बॅटरीवर चालणाऱ्या ड्रिलींग मशीनच्या मदतीने निवडलेल्या ठिकाणी ९ सेंटिमीटर खोल आणि १८ मिलिमीटर रुंद छिद्र पाडले जाते.

  • छिद्रातील धूळ स्वच्छ करून त्यात विशिष्ट रसायन सोडले जाते. त्यानंतर त्या छिद्रात महात्मा गांधी बोल्ट हातोड्याच्या मदतीने बसवला जातो. अवघ्या दहा मिनिटांमध्ये नवा बोल्ट दगडामध्ये मजबूत होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com