फेक TRP प्रकरण : महामुव्ही आणि न्यूज नेशन वाहिन्यांसाठीही पैसे घेतले, हन्साच्या माजी कर्मचाऱ्यांची कबुली

अनिश पाटील
Wednesday, 21 October 2020

फेक TRP प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आलेल्या हन्साच्या दोन माजी कर्मचाऱ्यांच्या चौकशीत महामुव्ही आणि न्यूज नेशन या वाहिन्यांसाठीही त्यांनी पैसे घेतल्याचे सांगितले आहे.

मुंबई, ता. 20 : फेक TRP प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आलेल्या हन्साच्या दोन माजी कर्मचाऱ्यांच्या चौकशीत महामुव्ही आणि न्यूज नेशन या वाहिन्यांसाठीही त्यांनी पैसे घेतल्याचे सांगितले आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

दिनेश विश्वकर्मा ( वय 37 वर्ष ) आणि रामजी वर्मा ( वय 44 वर्षे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही हंसाचे माजी कर्मचारी आहेत. टीआरपी वाढवण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या चौकशीत महामुव्ही व न्यूज नेशन वाहिन्यांसाठीही त्यांनी एजंटकडून पैसे घेतले असल्याचे सांगितले आहे. याशिवाय याप्रकरणी भादंवि कलम 174, 179, 201, 204 या कलमांची वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : देशद्रोह आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स; सोमवारी चौकशीस हजर राहण्याच्या सूचना

यापूर्वी याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला अटक केली होती. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी आहे. टीआरपीप्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी  ( वय 21 वर्षे ), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री ( वय 44 वर्षे ), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (वय 47 वर्षे ), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (वय 44 वर्षे ) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली होती.

संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची व व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या  यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाब अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

names of two more channels reviled in investigation of fake TRP case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: names of two more channels reviled in investigation of fake TRP case