छोट्या अदानींसाठी फडणवीसांचा 'नाणार' हट्ट; शिवसेनाचा हल्लाबोल : Nanar Project | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fadnavis_Thackeray

Nanar Project: छोट्या अदानींसाठी फडणवीसांचा 'नाणार' हट्ट; शिवसेनाचा हल्लाबोल

मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरीवरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकीय तापमान वाढलं आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नाणार प्रकल्प कोकणातच होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा सामना रंगला आहे. सामना वृत्तपत्रातून शिवसेनेनं फडणवीसांवर गंभीर आरोप करताना थेट इशाराच दिला आहे. (Nanar Project ShivSea slams on Devendra Fadnavis)

नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातनं महाराष्ट्रातून पळवून नेलेले वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्जपार्कसारखे प्रकल्प पुन्हा राज्यात खेचून आणा आणि त्यातला एखादा नाणारमध्ये उभा करा. पण तुम्ही तसे करणार नाही, कारण नाणार कोकणात येणार म्हणून शेकडो परप्रांतीय उद्योगपतींनी इथं जवळपास जमिनी खरेदी केल्या आहेत. हे सर्वजण भाजपचे अर्थपुरवठादार छोटे अदानी आहेत. त्या सगळ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून फडणवीस आणि त्यांचे सरकार कोकणाच्या मुळावर उठले आहेत.

भराडी देवीनं कौल दिल्यानं तुम्ही सत्तेत आल्याचं सांगता ही सर्वात मोठी थाप आहे. कारण तसं असतं तर खोके आमदार गुवाहाटीत रेड्यांवर स्वार होऊन गेलेच नसते. कौल घ्यायला ते थेट निर्भयपणे इथेच आले असते. फडणवीस कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं ते भरकटले आहेत. २०२४ पूर्वीच रेडे सरकार कोसळणार याची खात्री पटल्यानं ते थयथयाट करत आहेत.

अदानींच्या घोटाळ्याममुळं देशाचं, बँकांचं, एलआयसीचं आजिबात नुकसान झालेलं नसल्याची थाप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मारली त्यानंतर आता त्याच पद्धतीनं फडणवीस यांनी नाणार तिथेच होणार अशी थाप मारली आहे. पण या देवीला ढोंग चालत नाही. त्यामुळं भराडी मातेचा कोप होऊन तुमचा गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणं बळी जाईल, असा इशाराही शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbai News