जर्दा आहे सांगून बॅगेतून पाठवलं हशीश, हनीमुनसाठी गेलेलं दाम्पत्य आता कतारमध्ये खातंय जेलची हवा

अनिश पाटील
Saturday, 24 October 2020

हनीमुनसाठी आरोपींनी या दांपत्याला परदेशात पाठवले व त्यांना माहिती न देता त्यांच्या सामानात अंमली पदार्थ लपवले.

मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून कतार प्रशासनाशी संपर्क साधला आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरूवात केली आहे.

मोहम्मद शरीकआणि त्याची पत्नी ओनिबा कौसर गेल्यावर्षी जुलै महिन्यात हनीमुनसाठी कतार येथे गेले होते. त्यावेळी हमाद विमानतळावर त्यांच्याकडील बॅगेत चार किलो हशीश सापडली. ती बॅग शरिकच्या एका नातेवाईक महिलेने त्यांच्याकडे दिली होती. जलदगती न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ओनिबा यांचे वडील शकील कुरेशी यांनी शरीकची मावशी तब्बसूम कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा यांनी त्यांना याप्रकरणी अडकवल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती.

हनीमुनसाठी आरोपींनी या दांपत्याला परदेशात पाठवले व त्यांना माहिती न देता त्यांच्या सामानात अंमली पदार्थ लपवले. यावेळी त्यांनी महत्त्वाचे पुरावे व संभाषण सादर केले आहे. आरोपी महिलेने जर्दा असल्याच्या नावाखाली त्यांच्या बॅगेत हशीश ठेवले होते. त्याप्रकरणी एनसीबीच्या तपासात कारा याने तबस्सूमच्या मदतीने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले.

महत्त्वाची बातमी भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता! आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर

कारा व तबस्सूम दोघांनाही गेल्यावर्षी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याप्रकरणी आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर नुकतीच दोघांना एनसीबीने अटक केली आहे. त्यावेळी चौकशीत आरोपींनी गुन्हा कबुल केला असून त्यांनी या दांपत्याच्या माहितीशिवाय त्यांचा वापर तस्करीसाठी केल्याचे सांगितले. त्यांना जर्दा असल्याचे सांगून हशीश देण्यात आले. याप्रकरणी आता एनसीबी सर्व पुरावे कतारच्या संबंधीत यंत्रणाना पाठवणार असून त्याना या प्रकरणी नातेवाईकांना अडकवल्याची माहिती देण्यात येणार आहे. एनसीबीचे महासंचालक अस्थाना यांनी मुंबईत येऊन या सर्व कार्यवाहीची पडताळणी केली

( संपादन - सुमित बागुल )

Narcotic control bureau is doing all the process to rescue couple who were trapped in quatar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotic control bureau is doing all the process to rescue couple who were trapped in quatar