रमजानची रौनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national ramadan 2022 after two years its glory devotees namaz

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत रमजानच्या काळात बंद असलेल्या महम्मद अली रोडवरील खवय्येगिरी आणि तेथील रात्र पुन्हा जोमाने बहरली आहे. मुंबईसह राज्यातून आणि परराज्यांतूनही येणारी तरुणाई, आबालवृद्धांनी आपल्या आवडीचे असंख्य पदार्थ खाण्यासाठी तुफान गर्दी केली...

रमजानची रौनक

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत रमजानच्या काळात बंद असलेल्या महम्मद अली रोडवरील खवय्येगिरी आणि तेथील रात्र पुन्हा जोमाने बहरली आहे. मुंबईसह राज्यातून आणि परराज्यांतूनही येणारी तरुणाई, आबालवृद्धांनी आपल्या आवडीचे असंख्य पदार्थ खाण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. रमजानचा महिना बंधुभाव आणि त्यातून विश्वबंधुत्वाची शिकवण देतो, त्यामुळे येथील बाजाराने यंदा ‘युनायटेड बाय रमजान’ ही संकल्पना विकसित केली असून, त्याला सर्वधर्मीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

मागील सुमारे २५० वर्षांपासून महम्मद अली रोडवर रमजान काळात रात्रभर ‘खवय्येगिरी’चा मोठा वारसा आहे. या ठिकाणी मुंबईसह राज्यातून नागरिक येत असतात. येथे तयार होणाऱ्‍या विविध पदार्थांची चव घेऊन त्यावर ताव मारत असतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे येथील रात्र बहरली नव्हती, मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन निर्बंध हटवल्याने आता दोन वर्षांतील मोठी उणीव भरून निघाली आहे. परिणामी नागरिकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. महम्मद अली रोड आणि त्याचे खास ‘सिंबॉल’ म्हणून मागील ४०० वर्षांपासून ओळख असलेली ‘मिनारा मशीद’ही या रमजानच्या रात्रीने झळाळून निघाली आहे. तिच्यावर लावण्यात आलेली रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई येथे येणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.

महम्मद अली रोडवर सध्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, आपल्या आवडीच्या वस्तू, कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. येथील माशाअल्लाह हॉटेलचे मालक अब्दुल रहेमान म्हणाले, की आमच्यासाठी रमजानचा काळ हा मोठा उत्सवाचा असतो. संपूर्ण रात्रभर आमच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल आणि स्टॉलवर तरुणाई विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांवर ताव मारतात. सर्वच वयोगटातील नागरिकांचा यात सहभाग असतो. यंदा बाजारात गर्दीही वाढली आहे. महम्मद अली रोडवरील हा रात्रीचा ‘खाण्याचा’ उत्सव एक प्रकारे सर्वधर्मसमभावाची साक्षही देतो. येथे ६० टक्क्यांहून अधिक हिंदू बांधव येतात. राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणाचा थोडासा फरक जाणवत असला तरी त्यापेक्षा वाढलेल्या महागाईमुळे दैनंदिन आणि परत-परत येणारे खवय्ये निश्चितच कमी झाल्याचे रहेमान म्हणाले.

या पदार्थांना सर्वाधिक मागणी

मालपोहा, मँगो फेरणी, मसाला मिल्क, मटका रबडी, केशर बदामी मिल्क आदी पदार्थांची खास चव महम्मद अली रोडवर चाखायला मिळते. त्यात यावेळी नुरानी मिल्क सेंटरने मँगो रबडी फालुदा हा नवीन पदार्थ तयार केला असून, त्याची वेगळी चव अनेकांना आकर्षिक करत असल्याचे या सेंटरचे मालक जिलानी यांनी सांगितले.

टोपी, कपड्यांसोबत पुस्तकांचीही रेलचेल

महम्मद अली रोडवर मुस्लिम पद्धतीच्या असंख्य टोप्या, रुमाल यांची मोठी विक्री होते. येथे बरकती टोपी, पाकिस्तानी टोपी, हक्कानी टोपी आदींना मोठी मागणी असते. यावर्षी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यात पुस्तकांची मागणीही वाढल्याचे सिद्दिकी बुक या दुकानाच्या मालकाने सांगितले.

‘शाही तंदुरी प्लॅटर’ची चव

माशाअल्लाह हॉटेलने यावेळी आपल्या ग्राहकांसाठी ‘शाही तंदुरी प्लॅटर’ नावाची वेगळी आणि नवीन डीश तयार केली आहे. यात शिक कबाबसह आठहून अधिक मांसाहारी पदार्थ असतात. ही डिश किमान सहा ते आठ जण सहजपणे खाऊ शकतात, अशी माहिती अब्दुल रहेमान यांनी दिली. यासोबतच चिकनच्या रेश्मी बरर्रालाही खास मागणी असल्याचे त्यांनी सांगितले; तर हा पदार्थ आणि त्याची चव आपल्याला खूप भावल्याचे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या एका ग्राहकाने सांगितले.

नाखुदा मोहल्ला आणि पायधुनी बाजारही फुलला

महम्मद अली रोडच्या सुमारे ३०० मीटरच्या परिसरात इतर दोन महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. त्यात कपड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाखुदा मोहल्ला बाजार असून येथे दूरवरून नागरिक कपडे खरेदीसाठी येत असतात; तर विविध प्रकारच्या पादत्राणांसाठी प्रसिद्ध असलेला पायधुनी बाजार रमजानच्या काळात महम्मद अली रोडप्रमाणेच बहरलेला असतो. यंदा या दोन्ही बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

मांसाहारी पदार्थांचा घमघमाट

महम्मद अली रोडवर मांसाहारी पदार्थांची विशेष क्रेझ आहे. शिक कबाब, शाही तंदुरी, चिकन तंदुरी, लसूनी टीका, देशमी टीका, पहाडी टीका, लॉलीपॉप, रुमाली रोटी, पाया सूप, चिकन रोल, मटण रोल, चिकन कोरमा, छोटे कबाब, ब्लालेग्ज आणि हैदराबादी, लखनवी आदी विविध प्रकारची बिर्याणी याचे खास आकर्षण असते. कबाब आणि चिकन, मटणाच्या तळलेल्या पदार्थांचा सुगंध तर सर्वत्रच दरवळत असतो. चमचमीत पदार्थ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

Web Title: National Ramadan 2022 After Two Years Its Glory Devotees Namaz

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top