नवी मुंबईतही राष्ट्रवादीत अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

संदीप नाईक यांच्यासह 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात गणेश नाईकांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही लावलेल्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे घड्याळ गायब झाल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. याबाबत आपण उद्या नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण संदीप नाईक यांनी "सकाळ'शी बोलताना दिले आहे.

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजण्याआधी गणेश नाईक भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाईकांचा रथ रोखल्याने हा प्रवेश सोहळा होऊ शकला नाही. खुद्द नाईक यांनीही त्यावेळेस नवी मुंबईत झालेल्या सभांमध्ये आपण राष्ट्रवादीतच राहू असे छातीठोकपणे सांगितल्याने पक्षांतराच्या चर्चेला अल्पविराम मिळाला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीतील नामांकित नेत्यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

पक्षांतरामध्ये नवी मुंबईतील राष्ट्रवादीतून संदीप नाईक यांचे नाव आघाडीवर येत आहे. संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेली जवळीक त्याला कारणीभूत ठरलेली आहे. तसेच गणेश नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर लावलेल्या बॅनरवरून राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे गायब झालेल्या चिन्हाने पक्षांतराच्या चर्चांना अधिकच दुजोरा मिळत आहे.

साहेब ठरवतील ते धोरण
गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी मुंबई शहर बालेकिल्ला राहिला आहे. या किल्ल्यात माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांना मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय संख्या आहे. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्येही स्फूरण चढले आहे. कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर जोरदार युद्ध सुरू झाले आहे. यात "साहेब तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण' हा गणेश नाईकांचा फोटो असणारा संदेश अधिकच चर्चेचा ठरला आहे.

  • मी राष्ट्रवादीचा आमदार आहे. तसेच मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. सध्या राज्यभर पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. त्याप्रमाणे आमच्या पक्षातील नगरसेवकांमध्येही पक्षांतराच्या चर्चा सुरू असतील. त्यामुळे उद्या मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बैठक घेऊन बोलणार आहे. तेव्हाच कोण कुठे जातोय का हे स्पष्ट होईल.- संदीप नाईक, आमदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mubai sandip naik may exit from NCP