नवी मुंबईत 85 टक्के रुग्ण बरे; महापालिकेच्या या प्रयत्नामुळे कोरोना मृत्यूदरही घटला 

सुजित गायकवाड
Friday, 4 September 2020

नवी मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल सात महिन्यांनंतर यश मिळत आहे. जुलैमध्ये तर शहरात रुग्णसंख्या वाढू लागल्याने खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती; तर ऑगस्टमध्ये शहरातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

नवी मुंबई : शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात नवी मुंबई महापालिकेला अद्याप यश आले नसले, तरी कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा योग्य वापर केल्यामुळे ही सुधारणा झाली असून 31 ऑगस्टपर्यंत एकूण रुग्णांच्या तीन हजार 453 म्हणजे 85 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. जुलै महिन्यात हे प्रमाण 67 टक्के होते. 

हे वाचा : सुशांत सिंग प्रकरणात पोलिसांची बदनामी

नवी मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल सात महिन्यांनंतर यश मिळत आहे. जुलैमध्ये तर शहरात रुग्णसंख्या वाढू लागल्याने खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती; तर ऑगस्टमध्ये शहरातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. 31 जुलैपर्यंत शहरात सापडलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजार 602 इतकी होती. त्या वेळी 67 टक्के इतके बरे होणाऱ्यांचे प्रमाण होते. 

झकास : प्लाझ्मा दानासाठी महिलाही पुढे

अभिजित बांगर यांनी जुलैमध्ये आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. घरोघरी जाऊन फक्त कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या आणि त्यानंतर अलगीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणात महापालिकेतर्फे भर दिला जात आहे. रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेतर्फे खास ऍन्टीजेन टेस्ट करणारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याखेरीज विभागनिहाय विविध ठिकाणी ऍन्टीजेन चाचण्यांचे केंद्र स्थापन करून चाचण्यांवर भर दिला जात आहे. महापालिकेतर्फे दररोज सरासरी दोन हजार नागरिकांच्या ऍन्टीजेन चाचण्या करण्यात येत आहेत; तर 500 जणांना कोरोनासाठी करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या दोन्ही चाचण्यांनी 2 सप्टेंबरपर्यंत एक लाख 33 हजार 601 एवढा आकडा गाठला आहे. या बाबीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. 

रुग्णांना शोधून त्यांच्यावर लवकर उपचार केले जात असल्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या 85 टक्के या आजारातून मुक्त झाले आहेत, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

जुलैपर्यंत शहरात कोरोनाबाधितांच्या मृतांचे प्रमाण 3.3 टक्के इतके होते. परंतू आरोग्य विभागाने उपचार पद्धतींमध्ये बदल केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यात घट होऊन 2.2 इतका झाला आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रात एवढा कमी मृत्यूदर असणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे घेण्यात येत असणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे ही पद्धत अवलंबलेली आहे. अन्य आरोग्य सुविधाही वाढवल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. 

 दृष्टिक्षेप 
2 सप्टेंबरपर्यंत बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के 
आरटीपीसीआर चाचण्या- 53,171 
रॅपिड ऍन्टीजेन चाचण्या- 80,430 
कोरोनाबाधित रुग्ण- 26,777 
बरे झालेले रुग्ण- 22,690 
सद्यस्थितीत उपचार घेणारे रुग्ण- 3,483 
.... 
1 ऑगस्टपर्यंत बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के 
आरटीपीसीआर चाचण्या- 34,675 
रॅपिड ऍन्टीजेन चाचण्या- 18,454 
कोरोनाबाधित रुग्ण- 15,727 
बरे झालेले रुग्ण- 10,569 
उपचार घेणारे रुग्ण- 4,733 

  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Navi Mumbai, 85% of the patients recovered