प्लाझ्मादानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा 

भाग्यश्री भुवड
Thursday, 3 September 2020

सुमारे 150 जणांनी प्लाझ्मा दान केले असून यात 25 ते 30 महिलांनी प्लाझ्मा दान केले आहे.

मुंबई :  प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरत असल्याने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.  गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्लाझ्मा दान करण्यामध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त असले तरी प्लाझ्मा दानासाठी महिलाही मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण प्लाझ्मा दानात महिलांचे प्रमाण 25 टक्के आहे.  शिवाय, सार्वजनिक रक्तदानाच्या शिबिरांमध्ये ही प्लाझ्मा दानासाठी महिला इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. 

संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

गणेशोत्सवात रक्तदान शिबिरे आणि प्लाझ्मा दान शिबिरे मोठ्या संख्येने भरवली गेली. त्यापैकी मुंबईतील माहुल येथील श्री गणेशोत्सव मंडळाने रविवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या वेळी 83 बाटल्या रक्तदान करण्यात आल्याचे मंडळ अध्यक्ष राजेंद्र माहुलकर यांनी सांगितले. मात्र या वेळी बहुतांश महिलांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे रक्तदान शिबीर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सायन रुग्णालयाच्या ज्येष्ठ परिचारिका मीनाक्षी गायकवाड यांनी सांगितले. 

क्रॉफर्ड दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

तर एकूण शिबिरात रक्तदानासह प्लाझ्मा दानासाठीही महिलांकडून उत्साहाने इच्छा व्यक्त होत असल्याचे मंडळाचे अनंता भंडारी आणि महेश कोळी यांनी सांगितले. प्लाझ्मा दानात महिलांच्या सहभागाबाबत बोलताना नायर हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर डॉ. विशाल रख यांनी सांगितले की, सुमारे 150 जणांनी प्लाझ्मा दान केले असून यात 25 ते 30 महिलांनी प्लाझ्मा दान केले आहे. ही आकडेवारी उल्लेखनीय असून इच्छुक महिलांनी नक्की प्लाझ्मा दान करावे असे आवाहनही डॉ. विशाल रख यांनी केले आहे.

नवी मुंबईतील मॉलचे पुन्हा उघडले दार; अनलॉक 4 नुसार या अटीचे पालन करावे लागणार 

महिला ही प्लाझ्मा दान करू शकतात. हे ऐच्छिक दान असून आम्ही समुपदेशन आणि संवाद साधून दानासाठी आवाहन करत आहोत. मात्र, कोव्हिड पश्चात आरोग्य पाहून प्लाझ्मा दान स्वीकारले जाते. यासाठी अँटिबॉडीजची पातळी आवर्जून पाहिली जात आहे. 
-डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख पालिका हॉस्पिटल.

---
संपादन ः ऋषिराज तायडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many corona free women are interested to donate plasma amid corona treatment