नवी मुंबई आयुक्तांचा आणखी दोन रुग्णालयांना दणका; अव्वाच्या सव्वा बीले आकारल्याने कारवाई

सुजित गायकवाड
Sunday, 27 September 2020

वाशीतील ग्लोबल आणि ऐरोलीतील क्रिटी केअर या दोन रुग्णालयांवर कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

नवी मुंबई : मान्यता नसतानाही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील आणखी दोन खासगी रुग्णालयांना महापालिकेने दणका दिला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी वाशीतील ग्लोबल आणि ऐरोलीतील क्रिटी केअर या दोन रुग्णालयांवर कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

शहरात वाढत्या रुग्णांना वेळेत खाटा उपलब्ध व्हाव्यात, आयसीयू, व्हेन्टीलेटर आणि ऑक्सिजन सारख्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात याकरीता महापालिकेतर्फे खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात येत आहे. परंतू परवानगी देताना आयसीएमआर आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील नियमांचे पालन करावे लागते. खाटा, रुग्णालयाची क्षमता याची पडताळणी केली जाते. या नियमांची पूर्तता केल्यानंतरच महापालिकेतर्फे परवानगी दिली जाते. मात्र तरी सुद्धा काही रुग्णालये महापालिकेच्या परवानगीविनाच कोव्हिड 19 च्या रुग्णांवर सामान्य रुग्णांसोबत उपचार करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी तक्रार केली होती. तसेच संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांवर अव्वाच्या सव्वा बीले आकारली जात असल्याचे सावंत यांनी पालिकेला ही बाब निदर्शनास आणून दिली होती. या रुग्णालयांविरोधात पालिकेने चौकशी लावली होती. चौकशीनंतर या रुग्णालयांकडे पालिकेची परवानगी नसल्याचे दिसून आले. त्यानुसार बांगर यांनी क्रिटी केअर आणि ग्लोबल या दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कोव्हीड रुग्ण न तपासण्याचे आदेशही दिले आहे. विनापरवानगी कोव्हीड 19 रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी पामबीच, ग्लोबल आणि क्रिटी केअर या तीन रुग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीला पामबीच रुग्णालय वगळता दोन्ही रुग्णालयांनी स्पष्टीकरण दिले होते.

'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण

यादरम्यान ग्लोबल आणि क्रिटी केअर या दोन्ही रुग्णालयांनी महापालिकेकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मागितली होती. परंतू महापालिकेकडे कागदपत्र प्रक्रीयेत होते. परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र अर्ज केल्यानंतर परवानगी मिळेल असे गृहीत धरून क्रिटीकेअर व ग्लोबल यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने  याआधी वाशीतील पामबीच रुग्णालयावरही कारवाई केली आहे. या रुग्णालयाचा परवाना पंधरा दिवसांंसाठी निलंबित केला आहे. रुग्णालयाला बाह्यविभाग आणि उपचारासाठी कोणतेच रुग्ण घेता येणार नाही. शहरातील रुग्णालयांनी आणीबाणीच्या काळात सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. असे आवाहन अभिजीत बांगर यांनी केले आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Commissioner strikes two hospitals