esakal | गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शहरातील विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी-सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शहरातील विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी-सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत.

आजपासून (ता. २) गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता गणेशोत्सव उत्साहात पार पडावा, याकरता आवश्‍यक त्या उपाययोजना पालिकेमार्फत करण्यात आल्या आहेत. शहरात जवळपास ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे; तर आठ हजार घरगुती गणेशमूर्ती आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता स्वतंत्र विद्युत व्यवस्था, जनरेटर सुविधा, निर्माल्य कलशाची सोय तसेच जमा होणारे रोजचे निर्माल्य व इतर कचरा रोजच्या रोज उचलण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था; तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय उंच गणेशमूर्तींना अडथळा ठरू शकणाऱ्या रस्त्यांवर झुकलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे कामही पालिकेमार्फत सुरू आहे.

विसर्जनस्थळांची साफसफाई
शहरातील २३ तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. तेथील साफसफाई व आवश्‍यक दुरुस्ती कामांना सुरुवात करण्यात आली असून, ती अंतिम टप्प्यात आहेत. गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरता तराफ्याची तसेच मोठ्या गणेशमूर्तींसाठी क्रेन, ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी जीवरक्षक, सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. तलावाच्या काठावर बांबूचे बॅरिकेटही लावण्यात येणार आहेत.

प्रसाद, फळांसाठी स्वतंत्र कॅरेट
विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्‍या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. जमा होणारी फळे गरजू नागरिकांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत.

शहरात मोक्याच्या ठिकाणी १०० सीसीटीव्ही, अत्याधुनिक तराफे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना, प्रथमोपचार कक्ष, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, विसर्जन स्थळांवर स्वच्छता अशी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ १

loading image
go to top