नवी मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेचा अनोखा उपक्रम

पूजा विचारे
Sunday, 23 August 2020

नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरणार आहे. ही गाडी बाप्पाच्या मूर्तीचं संकलन करेल. त्यानंतर गणेश मूर्तींचं महापालिकेच्या स्वयंसेवकांकडून विधीवत विसर्जन केलं जाणार आहे.

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे. या व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार आहे. त्यात नवी मुंबई पालिकेनं अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन भागात महापालिकेची एक विशेष गाडी घरोघरी फिरणार आहे. ही गाडी बाप्पाच्या मूर्तीचं संकलन करेल. त्यानंतर गणेश मूर्तींचं महापालिकेच्या स्वयंसेवकांकडून विधीवत विसर्जन केलं जाणार आहे.

हेही वाचाः आज CBIचं पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाणार?,'या' मुद्द्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता

गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेकडून २३ मुख्य विसर्जन तलावांच्या जोडीला १३५ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आलेत. याशिवाय कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच पालिकेच्या गाड्या कंटेन्मेंट झोन भागात फिरुन विसर्जनासाठी मूर्ती संकलित करतील. 

महापालिका आयुक्तांचं भाविकांना आवाहन

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसंच गर्दी टाळण्यासाठी विसर्जनापूर्वी करण्यात येणारी निरोपाची आरती घरीच करुन आपल्या गणेशमूर्ती पालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात, असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योद्ध्याची भूमिका साकारावी. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह कायम राखून प्रत्येक नागरिकानं आरोग्यभान राखावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध सोयीसुविधांचा लाभ घ्यावा, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे. 

मुंबई महापालिकेचे विसर्जनावेळीचे नियम खालीलप्रमाणे

 • जे भाविक घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहेत, अशा भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे. 

 • मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या विसर्जन ठिकाणी नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जित करण्यास मज्जाव आहे. 

 • समुद्रावर पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच गणेशमूर्तीचे चौपाटीवर विसर्जन करण्यात येईल. पालिकेद्वारे याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आली आहे. 

 • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आलेत.
 • कृत्रिम तलावाजवळ राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणं बंधनकारक असेल.
 • पालिकेच्या प्रत्येक विभागा अंतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण केली आहेत. या संकलन केंद्रासंदर्भातली माहिती तसंच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसंच गुगल लोकेशनसह पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.
 • मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करणं बंधनकारक असणार आहे.
 • कंटेन्मेंट झोनमध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचं आहे किंवा ते विसर्जन पुढे ढकलावयाचं आहे. सील असलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तीचं विसर्जनाची घरीच व्यवस्था करावी, अशी सूचना देखील पालिकेनं दिली आहे.
 • पालिकेनं विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करुन फिरती विसर्जन स्‍थळे निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा, असंही पालिकेनं सांगितलं आहे. 
 • २०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
 • विसर्जना दरम्‍यान सोशल डिस्ट्न्सिंग, मास्‍क, सॅनिटायझर वापरणं इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे.

Navi Mumbai Municipal Corporation New Rules for ganesh festival visrjan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation New Rules for ganesh festival visrjan