घणसोली-ऐरोली उड्डाणपूल दिवास्वप्नचं..!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

घणसोलीवरून थेट ऐरोलीला जाण्यासाठी घणसोली-ऐरोली येथील खाडीवरून पालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी (ता. ३१) सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आले होता. मात्र, ऐनवेळी सिडकोने हात आखडता घेतल्याने या प्रस्तावाला पालिकेकडून स्थगिती देण्यात आली.

नवी मुंबई : घणसोली, ऐरोली येथे पामबीच मार्ग उभारण्यात आला आहे; मात्र कांदळवनाच्या जागेतून उड्डाणपूल टाकण्याच्या कामावरून हा मार्ग रखडला आहे. त्यामुळे घणसोलीवरून ऐरोलीला ठाणे-बेलापूरमार्गे वळसा घालून जावे लागते. म्हणून घणसोलीवरून थेट ऐरोलीला जाण्यासाठी घणसोली-ऐरोली येथील खाडीवरून पालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी (ता. ३१) सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आले होते; मात्र २९८ कोटी ९९ लाखांच्या खर्चाच्या या पुलासाठी ५० टक्के निधी देणार असल्याचे सिडकोने सांगितले होते; मात्र ऐनवेळी सिडकोने हात आखडता घेतल्याने या प्रस्तावाला पालिकेकडून स्थगिती देण्यात आली.

ही बातमी वाचली का? कुणी शिक्षक देता का?

घणसोली-ऐरोलीला जोडणारा पूल बांधण्यासाठी निम्मा खर्च सिडको आगाऊ देणार होती; मात्र आता १२५ कोटींचा निधी काम पूर्ण झाल्यावर देणार असल्याची भूमिका सिडकोने घेतली आहे. त्यामुळे पुलाच्या उभारणीसाठी लागणारा निधी मिळण्यास महापालिकेला अडचण निर्माण झाली आहे. परिणामी, पुलाचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून घणसोली-ऐरोली पुलाच्या उभारणीचा विषय रखडला आहे. खाडीवर पूल उभारण्यासाठी खारफुटीची अडचण आहे. त्याबाबतची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे येथे सर्वसाधारण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला. या पुलाच्या उभारणीसाठी सिडकोने निधी द्यावा, यासाठी पालिकेने सिडकोकडे पाठपुरावा केला. सिडकोने ५० टक्के खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवली. काम सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने सिडको हा निधी देणार होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी सिडकोने पुलाचे काम पूर्ण झाल्यावर फक्त १२५ कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेने याबाबतच्या प्रस्तावाला स्थगिती दिली.

ही बातमी वाचली का? अन समोरून धडधडत आला मृत्यू, बातमी वाचाल तर

१.९५ किमी लांबीचा उड्डाणपूल
घणसोली ते ऐरोलीदरम्यान हा १.९५ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. हा पूल उभारल्यास मुंबईला जाण्यासाठी वाहनचालकांना ठाणे-बेलापूर मार्गावरून न जाता घणसोलीवरून थेट ऐरोली आणि ऐरोली उड्डाणपुलावरून पुढे जाता येणार आहे. त्यामुळे ऐरोली जंक्‍शनवर होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र, प्रस्तावास स्थगिती देण्यात आल्याने ऐरोली-घणसोली खाडीपुलाचे काम हे पुन्हा रखडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation postpones proposal for Ghansoli Aeroli flyover