नवी मुंबईत लसीसाठी तयारी सुरू; वैद्यकीय आस्थापनांची माहिती गोळा   

नवी मुंबईत लसीसाठी तयारी सुरू; वैद्यकीय आस्थापनांची माहिती गोळा   

नवी मुंबई  : कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 44 हजारांपेक्षा अधिक झालेल्या नवी मुंबईत या आजाराविरोधातील लढाई जिंकण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रमुख शस्त्र ठरणारी लस वितरणाची तयारी सुरू केली असून सर्वात आधी कोरोना योद्‌ध्यांना ती देण्यासाठी माहिती गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचा या योद्‌ध्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शहरातील खासगी वैद्यकीय क्षेत्रातील आस्थापनांची माहितीही महापालिकेकडून गोळा करण्यात येत आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जुळे शहर म्हणून नवी मुंबई ओळखले जाते. दोन्ही शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याचा त्या शहराएवढाच फटका नवी मुंबईला बसला. मार्चमध्येच शहरातील वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरला होता. परंतु मोठ्या प्रयत्नानंतर या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आता या लढ्यातील प्रमुख अस्त्र ठरणाऱ्या लसीच्या वितरणाबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार सुरू केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेला कोरोना चाचणीच्या व्यवस्थापनासाठी तयारी सुरू करून माहिती सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत. यानुसार महापालिका आयुक्त बांगर यांनी आरोग्य विभागातील सर्व डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या जोमाने कोरोना लसीच्या वाटपाचे नियोजन तयार करत असून कोरोना योद्‌ध्यांना ही लस सर्वात अगोदर देऊन त्यांना आश्‍वस्त करण्यात येणार आहे. 
लस वितरणासंदर्भात आदेश मिळाल्यानंतर आता दररोज दिवसभरातून दोन वेळा बांगर हे आढावा घेत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे आवश्‍यक कागदपत्रे गोळा केली जात आहेत. 

अशी करतात माहिती गोळा 
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असणारे आणि नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सरकारने दिलेल्या संकेतस्थळावर भरली जात आहे. तसेच शहरातील खासगी वैद्यकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांना गुगल स्प्रेडशिट देण्यात आली आहे. यात करण्यात आलेल्या वर्गवारीनुसार संबंधित आस्थापनांनी माहिती भरून लवकरात लवकर महापालिकेकडे सादर करायची आहे. 

दृष्टिक्षेप 
- मार्चपासून रुग्ण 44222 
- कोरोनामुक्त रुग्ण 41421 
- शहरात उपचार घेणारे 1909 
- कोविड चाचण्या : 2,75,941 
- मृत्यू : 892 
- रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 93 टक्के 


 सरकारकडून कोरोनावर उपलब्ध होणारी लस शहरातील सर्व नागरिकांना मिळणार आहे. मात्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार सर्वात आधी ती जोखीम पत्कारणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका, रुग्णालयातील सफाई कामगार, वैद्यकीय तंत्रज्ञ आदी कोरोना योद्‌ध्यांना मिळणार आहे. त्याकरीता आपण सर्वांची माहिती गोळा करून सरकारला नियोजन करण्यात मदत करीत आहोत. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com