नवी मुंबई महापालिकेची अशीही गांधीगीरी; मास्क न लावणाऱ्यांना कारवाई ऐवजी गुलाबाचे फुल

सुजित गायकवाड
Friday, 2 October 2020

नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला रोखण्यात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच महापालिकेने गुलाबाचे फुल देऊन गांधीगीरी देखील दाखवली आहे.

नवी मुंबई : नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला रोखण्यात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच महापालिकेने गुलाबाचे फुल देऊन गांधीगीरी देखील दाखवली आहे. शहरात तोंडावर मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी अंतर न पाळणे, उघड्यावर थूंकणे असे बेशिस्तपणे वागणाऱ्या नागरीकांवर महापालिकेच्या भरारी पथकांमार्फत कारवाई मोहीम सुरू आहे. परंतू कारवाई केल्यानंतरही नागरीकांमध्ये फरक पडत नसल्याने अखेर पालिकेने महात्मा गांधी जयंती निमित्ताने गुलाबाचे फुल देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेच्या या गांधीगीरीवर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

मनसेकडून जुना व्हिडिओ शेअर करत अनोख्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा

शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने 35 हजारांचा पल्ला पार केला आहे. वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी पालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन रुग्णांना शोधले जाते. रुग्ण आढळ्यास त्याला तात्काळ विलगीकरण कक्षात पाठवा, त्याच्यावर उपचार करा, चाचण्या करा अशा विविध प्रकारे खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरी सुद्धा काही नागरीकांकडून बेशिस्तीचे दर्शन होते. सार्वजनिक जागेत फिरताना तोंडाला मास्क न लावणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न पाळणे, उघड्यावर थूंकणे आदी प्रकारे नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. अशा नागरीकांना जरब बसावी म्हणून पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. मात्र दंडात्मक कारवाई करणे हा पालिकेचा उद्देश नसून नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळावेत अशी अपेक्षा आहे. त्याकरीता गांधी जयंतीच्या औचित्याने पालिकेने गांधी मार्ग अवलंबला आहे.

मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट चालकांसाठी पालिकेची नियमावली जारी

दंड आकारण्यापेक्षा काही लोकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांच्यात जबाबदारीची भावना जागृत करण्याचा पालिकेतर्फे प्रयत्न केला जात आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी शिवाजी चौक, रेल्वे स्थानकांचा परिसर, बस डेपो आदी भागात जाऊन नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना हेरून कर्मचाऱ्यांमार्फत गुलाब पुष्प वाटले जात आहे. तसेच वाशीतील शिवाजी चौकात आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे गळ्यात प्रबोधनात्मक फलकबाजी करून जनजागृती करण्यात आली. घरात थांबा, "इतिहास' घडेल.. बाहेर गेलात तर "इतिहास' व्हाल, मौत से चिअर्स करोना.. भीड मत करोना, मास्क डोळ्यासमोर नव्हे.. तर नाका-तोंडा समोर लावा, लॉकडाऊन तोडून जो गर्दी करेल.. त्याची कोरोना लवकर विकेट पाडेल, असे घोषवाक्‍य लिहीलेले फलक नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते. 
-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal give Corporation Roses instead of action to those who do not wear masks