'सफाईमित्र'मध्ये नवी मुंबई महापालिका देशात दुसरी | Navi Mumbai municipal corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai municipal

'सफाईमित्र'मध्ये नवी मुंबई महापालिका देशात दुसरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या (central government) गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे 'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' अंतर्गत 'सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज' (cleaning campaign) अभियानात नवी मुंबई महापालिकेला (navi mumbai municipal) देशात द्वितीय क्रमांकाचे (second rank) मानांकन जाहीर झाले आहे. वॉटर प्लस मानांकनानंतर आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबईच्या शिरपेचात खोवला गेला आहे.

हेही वाचा: "एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

'मॅनहोल ते मशीनहोल' अर्थात सिवेज लाईन व सेफ्टिक टँकची धोकादायक पद्धतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान जाहीर करण्यात आले होते. मानवी पध्दतीने सफाईची कार्यवाही टाळून २००५ पासूनच यांत्रिकी पध्दतीने सफाईची कार्यवाही करणारी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानात आत्मविश्वासाने सहभागी झाली.

पालिका क्षेत्रातील नोडल भागात १०० टक्के मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे असून ६५६ सफाईमित्रांच्या माध्यमातून मलनि:स्सारण वाहिन्या, सेफ्टिक टँक यांची यांत्रिकी पद्धतीने नियमित स्वच्छता करण्यात येते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सफाईसाठी चेंबरमध्ये उतरुन कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या सफाईमित्रांना गणवेश, हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, फुल बॉडी वेदर सूट अशी आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आलेली आहेत. तसेच मलनि:स्सारण वाहिन्यांच्या अंतर्गत भागातील दूरपर्यंतची सफाई करण्याच्या दृष्टीने जेटींग मशीनच्या जेटींग पाईपला सिव्हर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

याशिवाय सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी सेफ्टीक टँक आहेत. तेथे लेव्हल ट्रान्समीटर लावण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण मुख्यालयातील डॅशबोर्डवरुन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे सेफ्टीक टँक ठराविक पातळीपर्यत भरला की त्याची माहिती मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला मिळून त्याची सफाई त्वरीत करणे शक्य होत आहे.

सफाई मित्रांना बळ

अभियानाच्या अनुषंगाने देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळांचा शुभारंभ नवी मुंबई महापालिकेत झाला.एमएमआर क्षेत्रातील कल्याण डोंबिवली व भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या अधिकारी, कर्मचारी वृंदासाठी सफाईमित्र चँलेंजविषयक माहितीपूर्ण कार्यशाळा नवी मुंबई महापालिकेने आयोजित केली. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने सफाई मित्रांसाठी लोन मेळा आयोजित करण्यात आला. अशा प्रकारे सफाईमित्रांना आर्थिकदृष्टया सक्षम करणाऱ्या कर्ज योजनेचा लाभ देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. स्वच्छता विषयक आधुनिक यंत्रसामुग्री घेऊन या कर्ज योजनेचा लाभ दोन सफाईमित्रांनी घेतला.

loading image
go to top