"एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी" | Atul bhatkhalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhatkhalkar

"एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (st bus corporation strike), राज्याला पडलेला प्रदूषणाचा विळखा (pollution problem) याकडे दुर्लक्ष करून, ​स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तेथे पर्यटन करीत आहेत. रोम जळत असताना निर्विकारपणे फिडेल वाजवीत बसलेल्या निरोची आठवण यानिमित्ताने येत असल्याची जळजळीत टीका, भाजप नेते अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी केली आहे.

हेही वाचा: राज्य सरकार विरोधात भाजपचा डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा

महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी स्थिती आल्याचे दिसते आहे. या दौऱ्याचा खर्च आदित्य ठाकरे यांच्याकडून वसूल करावा, अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. या परिषदेस आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पर्यटन करण्याचा सपाटा लावला आहे. महत्वाचे म्हणजे तेथे केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असताना आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते ? त्याचे त्यांना निमंत्रण होते का ? असे प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे एसटी ठप्प होऊन तिच्या तोट्यात भर पडत आहेच, पण संपामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. तरीही परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव आशिष कुमार यांना तेथे सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे ठाकरे यांना कारण काय ? ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला ? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मुख्यमंत्र्यांनीच उत्तरे द्यावीत. तसेच या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा अशी आग्रही मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

​मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत आहेत. याकडे दुर्लक्ष करून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न आहेत. ही बाब महाविकास आघाडी सरकारच्या आतापर्यंतच्या बेफिकीर कारभाराला साजेशीच आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

loading image
go to top