नवी मुंबई : दाखल्यासाठी पैसे मागणारे दोन शिक्षक निलंबित | Navi Mumbai news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

नवी मुंबई : दाखल्यासाठी पैसे मागणारे दोन शिक्षक निलंबित

नवी मुंबई : शाळा सोडल्याचा दाखला (school leaving certificate) देण्यासाठी चक्क दीड हजार रुपये मागणाऱ्या महापालिका शाळेतील (Municipal school) मुख्याध्यापक आणि गुण वाढवण्यासाठी पैसे मागणाऱ्या शिक्षकाला अखेर निलंबित (teacher suspended) करण्यात आले आहे. या प्रकरणी लाचखोर शिक्षकांचा ‘सकाळ’ने बातमी (sakal news) प्रकाशित करून भांडाफोड केली होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit bangar) यांनी त्याची दखल घेऊन कार्यालयीन प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक दीपक बडगुजर आणि शिक्षक शंकर कुसकर या दोघांना निलंबित केले.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

महापालिकेची तुर्भे येथील शाळा क्रमांक १०७ मध्ये १७ क्रमांकाचा अर्ज भरून बाहेरून परिक्षा देणाऱ्या मुकुंद बागडे या दहावीच्या वर्गात शिक्षण घेते होता. कोविड काळात मुकुंदच्या आईकडून शाळेचा दाखला सोडण्यासाठी बडगुजर यांनी दीड हजार रुपये मागितल्याची तक्रार त्याच्या आईने केली. तसेच दहावीच्या परीक्षेत यंदा शाळेकडून देण्यात येणाऱ्या गुण प्रक्रियेत गुण वाढवून देण्यासाठी पाच हजार रुपये देण्याची मागणी शंकर कुसकर या शिक्षकाने केल्याची गंभीर तक्रारही मुकुंदच्या आईने केली होती.

मुकुंदच्या आईने मांडलेली व्यथा ऐकल्यानंतर शाळेची बाजू समजून घेण्यासाठी टीम ‘सकाळ’ने शाळेचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर आणि कुसकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, बडगुजर यांनी आपण पैसे मागितल्याची कबुली दिली. परंतु ते चुकीने मागितल्याचे सांगितले. तर कुसकर यांनी आपण त्या विद्यार्थ्याच्या आईकडे पैसे मागितले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या घटनेमुळे महापालिकेच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांच्या लुटमारीची घटना उघडकीस आल्याने अभिजित बांगर यांनी दोन्ही शिक्षकांची कार्यालयीन चौकशी सुरू केली.

चौकशीत विद्यार्थ्याच्या आईने आपली तक्रार कायम ठेवल्याने दोन्ही शिक्षकांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीला दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याने दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून दोन्ही शिक्षकांची विभागीय चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली.

अशाप्रकारे घटना उघडकीस

पीडित विद्यार्थ्याच्या आईने काँग्रेस इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांची भेट घेऊन पैशांची मागणी केल्‍याची व्यथा मांडली. सावंत यांनी दोन्हीकडील बाजू लक्षात घेऊन आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे कारवाई करण्याची तक्रार केली. तक्रारीवर बांगर यांनी दोन्ही शिक्षकांना कारणे द्या नोटीस बजावली होती.

loading image
go to top