सावधान..! तुमचे हातमोजे वापरलेले तर नाही ना? नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल

सुजित गायकवाड, विक्रम गायकवाड
Wednesday, 19 August 2020

हातमोजे धुण्यासाठी दोन वॉशिंग मशिन, धुतलेले हातमोजे सुकवण्यासाठी ब्लोअर मशिन, पॅकिंगचे साहित्य असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवी मुंबई : डॉक्‍टरांकडून कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे धूवून करून पुन्हा विक्री करणारी टोळी नवी मुंबईत सक्रीय झाली आहे. वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा विक्री करताना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला रंगेहात अटक केली. या व्यक्तीच्या अटकेनंतर पोलिसांना छापा टाकला असता 4 लाख नग हातमोजे आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6 लाख रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर प्रकरणात पोलिसांना आढळून आलेल्या साहित्यावरून मोठी टोळी सक्रीय असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले रबरी हातमोजे वापरलेले तर नाहीत ना..अशी भीती नागरिकांच्या मानात निर्माण झाली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णांना हाताळण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यांची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी आणि पुरवठा लक्षात घेता उत्पादन कमी असल्यामुळे काही ठिकाणी आवश्‍यक साहित्यांची किंमत वाढण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा धुवून वापरण्याची क्‍लृप्ती नवी मुंबईत काही अज्ञातांनी शोधून काढली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून या टोळ्यांचा मनसुबा धुळीस मिळवला आहे. पावणे एमआयडीसीतील गामी इन्डस्ट्रीयल पार्क येथे गाळा क्रमांक 29 व 80 येथे काही इसम कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी वापरण्यात आलेले रबरी हातमोजे धूवून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल राख यांना मिळाली होती. 

CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत डॉक्‍टरांनी वापरलेले, न धुतलेले व धुतलेले तीन ते चार क्विंटलच्या अशा एकूण 263 गोण्या सापडल्या. या गोण्यांमध्ये डॉक्‍टरांनी वापरलेले निळ्या रंगाचे अंदाजे 4 लाख नग हातमोजे एका पाकिटात भरून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच हातमोजे धुण्यासाठी दोन वॉशिंग मशिन, धुतलेले हातमोजे सुकवण्यासाठी ब्लोअर मशिन, पॅकिंगचे साहित्य असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळाहून प्रशांत सुर्वे या इसमाला ताब्यात घेतले आहे. डॉक्‍टरांकडून कोव्हिड रुग्णांसाठी वापरण्यात आलेले निळ्या रंगाचे रबरी हातमोजे नष्ट करण्याऐवजी काही इसम टोळीने बेकायदेशीररीत्या या वापरलेल्या रबरी हाजमोज्यांना धुवून पुन्हा विक्रीसाठी वापरत असल्याचा दाट संशय गुन्हे शाखेतर्फे व्यक्त केला जात आहे.

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

हातमोजे गोळा करण्यासाठी मजुरांचा वापर
दवाखान्यांमधून गोळा करण्यात आलेले वापरलेले रबरी हातमोजे काढून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी 200 रूपयांच्या रोजंदारीवर मजूर घेण्यात आले होते. मजुरांच्या मदतीने रोज येणारे वापरलेले हातमोजे काढून मशिनमध्ये धुवून ते सुकवून नंतर पुन्हा एका चांगल्या पाकीटात विक्रीसाठी भरले जात होते.
-----

राज्यभरात विक्री
या टोळीकडून वापरलेले हातमोजे पुन्हा पँकींग करून ते मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिकसह परराज्यातही विक्रीसाठी पाठवल्याचे तपासात समोर आले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai police arrests persons who were selling used hand gloves