एपीएमसीमधील आणखी एका व्यापाऱ्याला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

एपीएमसीतील धान्य बाजारातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित होणारा एपीएमसीतीला हा दुसरा व्यापारी आहे. हा व्यापारी सानपाडा सेक्‍टर १८ मधील रहिवासी आहे.

नवी मुंबई : एपीएमसीतील धान्य बाजारातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित होणारा एपीएमसीतीला हा दुसरा व्यापारी आहे. हा व्यापारी सानपाडा सेक्‍टर १८ मधील रहिवासी आहे. याआधी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला लागण झाली होती. ऐरोलीतील कोरोनाग्रस्त असलेल्या एका बॅंक व्यवस्थापकाच्या संपर्कात आल्याने त्याच्याच कुटुंबांतील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. नवी मुंबईत शुक्रवारी दिवसभरात सापडलेल्या चार रुग्णांमुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ इतकी झाली आहे. 

एपीएमसीतील ६२ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यापारी राहत असलेल्या परिसराचे पालिकेने निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच धान्य मार्केटमधील एल लाईन सील करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऐरोलीतील दिवा गावात एका बॅंकेच्या व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्याच घरातील संपर्कात आलेल्या तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पालिकेला मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ऐरोलीतील या एकाच घरातून चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सदस्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना तपासण्याचे करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू झाले आहे. 

महत्त्वाची बातमी ... ‘ते’ सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास

एपीएमसीत तपासण्या सुरू 
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महापालिकेतर्फे एपीमएसीतील भाजीपाला, कांदा-बटाटा आणि धान्य बाजारात तीन पथकांद्वारे कोरोना चाचणीसाठी स्वॅब टेस्ट घेण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. व्यापारी आणि बाजारात येणारे ग्राहक, तसेच समितीमधील कर्मचारी यांची थर्मल स्क्रिनिंग करून गरज वाटल्यास नमूने घेतले जात आहेत. 

अरे वाह.... रायगडचा आंबा ऑनलाईन

दोन परिचारिकांनाही लागण 
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे नवी मुंबईतील ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात कामाला असणाऱ्या आणि बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात नव्याने कामावर लागलेल्‍या अशा दोन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. याप्रकरणी अपोलो रुग्णालयाला पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, करावे गावात राहण्यासाठी असलेल्या एका ३६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती शिवडीतील टी. बी. रुग्णालयात कक्षसेवक म्हणून कार्यरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai total Corona patient now on 58