नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

कोरोनामुळे सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीच्या वातावरणात जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची संख्या कमी असल्याने शहरात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून लवकरच शहरात पाच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीच्या वातावरणात जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची संख्या कमी असल्याने शहरात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून लवकरच शहरात पाच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांची धावपळ आता कमी होणार आहे. 

मोठी बातमी ः कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा

ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन म्हात्रे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या मार्च माहिन्यांपासून नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे. सुरूवातीला असणारा दोन अंकी आकडा आता वाढत जाऊन तीन अंकी झाला आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. ते पाहता लवकरच एक हजार रुग्ण होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. ज्या भागातून रुग्ण सापडतात त्याभागातून रुग्ण आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. तसेच रुग्ण बरा झाला की त्याला सोडायलाही रुग्णवाहिकाच लागते. शहरात कोरोनामुळे रुग्णवाहिकेची गरज वाढल्याने नवी मुंबई शहरात रुग्णवाहिकेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या तसेच सरकारी रुग्णवाहिकांव्यतिरीक्त खासगी रुग्णवाहिकेची मदत घेतली जात आहेत. त्या महागड्या ठरत असून अनेकदा वेळेवर उपलब्ध होत नाहीत.

मोठी बातमी ः कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची कामगिरी बजावते. मात्र अशा आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने मंदा म्हात्रे यांनी पूढाकार घेतला आहे. त्यांच्या आमदार निधीतून शहरातील  पालिकेच्या रुग्णालयांना पाच रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

मोठी बातमी ः भीषण ! येत्या सहा महिन्यात तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता 

याबाबत नार्वेकर यांनीही तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच शहरात पाच रुग्णवाहीका उपलब्ध करण्याचे आश्वासन म्हात्रे यांना दिले आहे. त्यामुळे शहराचा रुग्णवाहीकेचा प्रश्न सुटणार आहे. यापूर्वीही मंदा म्हात्रे यांनी महापालिकेचा रुग्णवाहीका दिली असून सध्या रुग्णांची ने-आण करण्यासाठी तीचा प्रभावी वापर केला जात आहे. 
 

रुग्णांची ने-आण करण्याचे महत्वाचे काम रुग्णवाहिका करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात रुग्णवाहिकांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे नागरीकांच्या सेवेसाठी लवकरच शहरात पाच रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai will get five ambulance soon by mla manda mhatre