मुख्यमंत्र्यांनंतर 'या' बड्या नेत्यांच्या घरी खणखणले धमकीचे फोन, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे. दोन्ही बड्या नेत्यांना देशाबाहेरुन हे फोन कॉल आल्याचं समजतंय.  

मुंबईः रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची घटना घडली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे. दोन्ही बड्या नेत्यांना देशाबाहेरुन हे फोन कॉल आल्याचं समजतंय.  शरद पवार यांनाही त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला. तर गृहमंत्री देशमुख यांनी कंगना राणावतवर टिका केल्यानं हा धमकीचा फोन आला आहे. या फोन प्रकरणाची चौकशी आता सुरक्ष यंत्रणा करत आहेत.

दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. तसंच वर्षा बंगल्यावरही हे धमकीचे फोन आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने ३ ते ४ फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते. सध्या  गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

अधिक वाचाः  कंगनाविरोधात तक्रार दाखल; मनपाचे अधिकारी कंगानाच्या कार्यालयात दाखल

मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री ११च्या सुमारास ४ फोन कॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. 

अधिक वाचाः  पावसाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांसह तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह
 

पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं गृहमंत्र्यांनी कंगनाविरोधात वक्तव्य केलं होतं. यावरुनच त्यांनाही कालच धमकीचे फोन आलेत. तसंच  या प्रकरणी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचंही कळतं.

NCP Chief Sharad Pawar Home Minister Anil Deshmukh Receives Threat Call From Out Of India


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar Home Minister Anil Deshmukh Receives Threat Call From Out Of India