भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी उचलणार 'हे' पाऊल..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी. राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक

मुंबई -  राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. जी प्रक्रिया आता सुरु झाली ती अगोदर होवू शकत होती असेही नवाब मलिक म्हणाले. 

आमदार फोडाफोडीचा घोडेबाजार सुरु होवू नये, यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करु शकतो असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

तेराव्या विधानसभेची मुदत आज संपल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. राज्यपालांच्या या पत्रावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपने उद्या, रविवारी कोअर समितीची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा करायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात 21 ऑक्‍टोबरला मतदान होऊन 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नाही. 

राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत 105 आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली आहे.

Webtitle : NCP leader nawab malik on governess invitation to bjp to form government  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader nawab malik on governess invitation to bjp to form government