Mumbai : मुख्यमंत्री शिंदे यांना पवारांचा सबुरीचा सल्ला

दसरा मेळाव्यावरून शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना सबुरीचा सल्ला दिला
Sharad Pawars
Sharad Pawars Sakal

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद रस्त्यावर येण्याची चिन्हे असतानाच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना सबुरीचा सल्ला दिला.ठाकरे-शिंदे वादात पवार यांनी शनिवारी त्यांची मते मांडली. ‘मुख्यमंत्र्यांनी संघर्षाऐवजी सर्वसमावेश भूमिका घ्यावी,’ असे सांगत पवार यांनी मेळाव्याचा वाद वाढू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्तापालटानंतरही शिवसेना आणि शिंदे गटातील वाद विकोपाला जात असून, पक्ष संघटनेवरूनही या दोन्ही गटाने बाह्या सरसावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अनिल परब यांच्याकडून २३ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला अर्ज दाखल करण्यात आला आहे तर शिंदे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी सदा सरवणकर यांनी दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला आहे.

पक्ष संघटनेचा वाद न्यायालयात असतानाच भविष्यातील रणनीती म्हणून आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळावा घेण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर नेमकं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिकेने यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही.

सर्वसमावेशक भूमिका घ्या

या वादामध्ये ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज भाष्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. पवार म्हणाले, “मेळावे घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहेत. पण त्यावरून वाद होऊ नयेत. वादाच्या घटना टाळल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनीही संघर्ष न करता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. याबाबत सामोपचाराने काही बाबी होतील, त्याकडे लक्ष द्यावे. पवार यांच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील वादात पवार उतरल्याने भाजप आणि शिंदे गटातील आमदारांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

राज ठाकरेंना साद

शिंदे-ठाकरे वादात शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी मेळावा घ्यावा, अशी भावनिक साद मनसैनिकांकडून राज ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र ट्विट केले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे घेणार... याबाबत उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com