शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी

समीर सुर्वे
Thursday, 3 December 2020

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे.

मुंबई:  शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथील 946 झाडांचा  बळी जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पूल आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी 288 झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी 1 हजार 234 झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना बुधवारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

शिवडी न्हावाशेव हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे मुंबई ते न्हावाशेवा हा प्रवास अवघ्या काही मिनिटात शक्य होणार आहे. हा मार्ग शिवडी खाडी परीसरातून जात आहे. हा मुंबईचा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे. या भागात मोठी वृक्ष संपदा आहे. या भागात सामान्य नागरिकांचा वावर फार तुरळक आहे. या भागातील 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मिळण्याची विनंती MMRDA कडून महानगर पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजूरी देण्यात आली आहे. त्याच बरोबर महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून नवा पुल बांधण्यात येणार आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या भागात दुसराही उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या दोन पुलांसाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करण्याची परवानगी बुधवारी वृक्ष प्राधिकरणाने दिली. सॅन्डहर्स्ट रोड येथील हॅकॉक पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 20 झाडे कापणे आणि 12 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगीही वृक्ष प्राधिकरणने दिली आहे. प्रकल्पांसाठी झाडे कापण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, पुनर्रोपीत केलेली झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच त्यांचा कोणताही हिशोब महानगर पालिकेकडून ठेवला जात नाही.

अधिक वाचा-  मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा

 सार्वजनिक प्रकल्पांसह अंधेरी येथील मोगरा गावातील झोपू योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठीही 41 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर नाहूर येथील इमारतीच्या बांधकामा आड येणारी 119 वृक्ष कापण्यास आणि 66 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
शिवडीच्या बदलत्यात वसईला झाडे

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथून कापण्यात आलेली झाडे वसई येथील राजवली, कामन गावात करण्यात येणार आहे. येथे साधारण दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहे. मुंबईच्या कॉक्रिटच्या जंगलात अनेक दशकांपासून तग धरुन असलेली झाडे प्रकल्पांसाठी कापण्यात येणार आहे. त्या बदल्यात वसई तालुक्यातील राजावली आणि कामन या दोन गावात झाडे लावली जाणार आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nearly one thousand trees sacrificed for sewri nhava sheva project