दिलासादायक! ठाण्यात होणार कोरोनाबाधितांवर आवश्यक शस्त्रक्रिया

राहुल क्षीरसागर
बुधवार, 29 एप्रिल 2020

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्णतः 'कोव्हिड' रुग्णालय घोषित झाले आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. त्यात या बाधित रुग्णांना डायलेसिससह अन्य कोणत्या उपचाराची अथवा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यास त्या शास्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी सर्व सोयींनीयुक्त असे शस्त्रक्रिया विभाग सज्ज करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्णतः 'कोव्हिड' रुग्णालय घोषित झाले आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. त्यात या बाधित रुग्णांना डायलेसिससह अन्य कोणत्या उपचाराची अथवा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यास त्या शास्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी सर्व सोयींनीयुक्त असे शस्त्रक्रिया विभाग सज्ज करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी 'गूड न्यूज' लवकरच येणार...

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे होत असल्याने दिलासा देखील मिळत आहे. मात्र, दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय 'कोविड-19' घोषित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात कोरोना संशयित व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात 156 रुग्ण उपचारार्थ दाखल असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. 

या रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधोपचार देण्यात येत आहेत. तर, मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत असतात. त्यात जे रुग्ण किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत, तसेच ज्यांना डायलेसिसची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलेसिस विभाग सुरू करण्यात आला आहे.

गुपचूप उरकले लग्नसोहळे! लॉकडाऊनमुळे पडली नवी प्रथा!

तसेच एखाद्या कोरोनाबाधित गरोदर महिलेची प्रसूती देखील आता करण्यात येणार असून नवजात बाळाला आवश्यक असलेला 'एसएनसीयू' विभाग देखील सज्ज ठेवण्यात आला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांवर सर्जरी करण्याची सुविधा देखील रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यासाठी सर्व सोयींनीयुक्त असे शस्त्रक्रिया विभाग सज्ज ठेवले आहे.
- डॉ. कैलास पवार
जिल्हा शल्यचिकित्सक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Necessary surgeries on corona patients to be performed in Thane