गुपचूप उरकले लग्न सोहळे, लॉकडाऊनमुळे पडली नवी प्रथा!

गुपचूप उरकले लग्न सोहळे, लॉकडाऊनमुळे पडली नवी प्रथा!

मुरबाड : कोरोना विषाणूने मानवाला एकाच जागी खिळवून ठेवले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन घोषित केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या काळात चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यासही बंदी घालण्यात आल्याने लग्न समारंभ, साखरपुडे, उद्घाटन, लोकार्पण सोहळ्यांवर संक्रांत आली आहे. लग्नाचे अनेकांचे मुहूर्त टळले असले तरी काहींनी अनोखी शक्कल लढवत मोजक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून, मास्क घालून पहाटेच्या सुमारासच लग्न सोहळे उरकून घेतल्याचे समोर आले आहे. यातून दोन्ही कुटुबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे.   

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दोन-तीन महिने अगोदरच मुहूर्त काढून ठरवलेली लग्ने, वास्तूशांती, साखरपुडा रविवारी (ता. 26) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फक्त दहा-पंधरा कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचूप उरकण्यात आली. यामुळे नागरिकांची लाखो रुपयांची बचत झाली आहे.

लग्न पत्रिका, लग्नापूर्वी हळदी समारंभ, स्पीकर, मंडप, बेंजो आदी कशाचाच खर्च नाही. आलेल्या मोजक्याच पाहुण्यांसाठी जेवण किंवा चहा-वेफर, फरसाणाचा बेत आखण्यात आला. लग्न सोहळ्यात मान-पान यासाठी गरिबातील गरिबाला सुद्धा किमान लाखभर रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सोहळे 'शॉर्टकट'मध्ये पार पडल्याने लाखो रुपयांची बचत झाली आहे. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारने जमावबंदी लागू केली आहे. चारपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास परवानगी नाही, हे लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यात अनेक सोहळे गुपचूप उरकली गेली. केवळ लग्नच नव्हे तर घराचे भूमिपूजन, वास्तूशांती समारंभ सुद्धा कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीमध्ये उरकण्यात आले. लॉकडाऊनच्या निमित्ताने ही अत्यंत चांगली प्रथा सुरू झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे.

वस्तूंचा असाही बंदोबस्त
   खायची पाने बाजारात मिळत नसल्याने देवा पुढे विडा ठेवण्यासाठी काही नागरिकांनी घराजवळ असलेल्या वेलीवरची पाने वापरली. चप्पल, कपड्याची दुकाने बंद असल्याने पुढाऱ्यांना सांगून ही दुकाने गुपचूप उघडली गेली. केवळ एक व्यक्ती जाऊन हव्या असलेल्या वस्तू खरेदी करून घेतल्या. त्यामुळे थोडक्यात का होईना, अगदी निर्विघ्नपणे हे सोहळे पार पडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com