esakal | वैद्यकीय महाविद्यालय- हॉस्पिटल उभारणीसाठी चालना देण्याची आवश्‍यकता: आरोग्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय महाविद्यालय- हॉस्पिटल उभारणीसाठी चालना देण्याची आवश्‍यकता: आरोग्यमंत्री

पालिका मुख्यालयात कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्व सामान्यांसाठी रेल्वे सेवा आणि धार्मिक स्थळे उभारण्याबाबत दिवाळीनंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे टोपे यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालय- हॉस्पिटल उभारणीसाठी चालना देण्याची आवश्‍यकता: आरोग्यमंत्री

sakal_logo
By
सुचिता करमरकर

मुंबईः  कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात मुंबईप्रमाणेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून नवीन रुग्णालये उभी करण्याची गरज असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीसाठी टोपे पहाटे कल्याणात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शहरात पाहणी केली तसेच पालिका मुख्यालयात कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्व सामान्यांसाठी रेल्वे सेवा आणि धार्मिक स्थळे उभारण्याबाबत दिवाळीनंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे टोपे यांनी यावेळी सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचे आरोग्यमंत्र्यांनी कौतुकही केले.  शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने विशेष संचालनालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये साथ रोगासाठी विशेष रुग्णालय उभे करण्याची आवश्यकता असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा-  राज्य सरकारकडून ST महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज,अनिल परब यांची घोषणा

एक हजार खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयासाठी राज्याच्या आरोग्य तसेच नागरी विकास विभागाकडून मदत करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. पालिका क्षेत्रात रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून रुग्णालय उभारणीच्या कामांना वेग देण्याच्या सूचना टोपे यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत. परदेशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही अशी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी सरकारने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन टोपे यांनी केले.  सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. 

पालिकेला वैद्यकीय अधिकारी मिळणार

कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने तेथे त्वरित उत्तम अधिकारी नेमला जावा अशा सूचना जिल्हास्तरीय यंत्रणांना दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे पालिका रुग्णालयात फिजिशियनची कमतरता असल्याने त्याबाबतही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा-  बिहारमध्ये 'जंगलराज' संपून 'मंगलराज' येणार; बिहार निवडणुकांच्या निकालांवर संजय राऊतांची कमेंट

वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी विशेष लक्ष देणार

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी विशेष लक्ष दिले जात असल्याचे टोपे यांनी सांगितले. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून केंद्राकडूनही या कामासाठी परवानगी तसेच मदत मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Need to give impetus for setting up of medical colleges and hospitals Rajesh tope