नीट परीक्षार्थिंना गलथाल कारभाराचा फटका; अचानक परिक्षाकेंद्र बदलल्याने विद्यार्थी-पालकांना मानसिक त्रास

नीट परीक्षार्थिंना गलथाल कारभाराचा फटका; अचानक परिक्षाकेंद्र बदलल्याने विद्यार्थी-पालकांना मानसिक त्रास

मुंबई  : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवार पार पडली. मात्र, मुंबईत ऐनवेळी परीक्षेचे केंद्र बदलण्यात आल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) केलेल्या या चुकीबद्दलही अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली. करोनामुळे दोन वेळा ही प्रवेश प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली होती.

देशात एनटीएकडून घेण्यात येणार्या परीक्षेची 
काही केंद्रे अचानक दोन दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती. मात्र,अनेक पालक तसेच परीक्षार्थींना या बदलाची माहिती पोहोचलीच नाही. त्यामुळे बदललेल्या केंद्राची व्यवस्थित माहिती न मिळाल्याने त्याचा मोठा फटका परीक्षार्थिंना बसला. एनटीएकडून मुंबईतील निर्मला निकेतन कॉलेजचे परीक्षा केंद्र बदलून ते चुनाभट्टी जवळील एव्हराड नगर येथे असलेल्या वसंतदादा पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये देण्यात आले होते. परंतु, हे परीक्षा केंद्र बदलत असताना एनटीएकडून मुंबई ऐवजी 'नवी मुंबई' असा उल्लेख  करण्यात आला होता. यामुळे पालकांची फार मोठी गैरसोय झाली.

अनेक परीक्षार्थिंना केंद्रावर गेल्यानंतर केंद्र बदलल्याचे समजल्याने त्यांनी नवीन  ठिकाणी भाव घेतली. मात्र या गोंधळात अनेक विद्यार्थी वसंतदादा पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये वेळेत पोहोचू शकले नाहीत. कल्याणहून नवी मुंबईपर्यंत पत्ता शोधून शेवटी एव्हराड नगर येथे पोहोचलेल्या एका पालकानेही बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर दक्षिण मुंबईतून आलेल्या पालकांनाही केंद्र बदलल्याची माहिती अचानक समजल्याने त्यांनी धावपळ करत अधिकचे पैसे मोजून टॅक्सीने परीक्षा केंद्र गाठले. या सर्वात मानसिक त्रास सहन करावा लागला अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. या केंद्र बदलाबाबत एनटीएने वेबसाइटवर दोन दिवस आधी तपशील दिला होता. मात्र त्यात ज्या विद्यार्थ्यांनी केंद्र बदलाची मागणी केली होती त्यांचा तपशील होता. ज्यांनी मागणी केली नव्हती अशा विद्यार्थ्यांचेही केंद्र बदलण्यात आल्याने आयत्यावेळी गोंधळ उडाला. 

राज्यातून या परीक्षेला दोन लाख 28 हजार 914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ही परीक्षा 615 केंद्रावर घेतली जात असून मुंबईत एक, नांदेड, नागपूर प्रत्येकी दोन आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली व सटाणा तालुक्यातील एक परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते. देशभरातून नीट (यूजी)साठी 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ही परीक्षा तीन हजार 842 परीक्षा केंद्रांवर घेतली. 

परीक्षा केंद्रावर गर्दी
रविवारी पार पडलेल्या परीक्षा केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजल्यापासून उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.  प्रत्यक्ष परीक्षा 2 वाजता असतानाही परीक्षा केंद्रावर प्रचंड गर्दी दिसली. परीक्षा केंद्रात नियम पाळले जात असले तरी बाहेर मात्र पालकांची मोठी गर्दी  होती. तसेच परीक्षा संपेपर्यंत बहुतांश पालक केंद्राबाहेरच थांबल्याने त्यात अधिक भर पडली. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com