ठाण्यातील उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

दीपक शेलार
Tuesday, 3 December 2019

बच्चेकंपनी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ठाणे शहरात अनेक उद्याने उभारण्यात आली असून या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती नियमित होत नसल्याने या उद्यानांना मरगळ आल्याचे चित्र आहे.

ठाणे : बच्चेकंपनी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ठाणे शहरात अनेक उद्याने उभारण्यात आली असून या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती नियमित होत नसल्याने या उद्यानांना मरगळ आल्याचे चित्र आहे. वर्तकनगर येथील भीमनगरमधील थोर संगीतकार श्रीनिवास खळे उद्यानाचीही अशीच वाताहत झाली आहे. या उद्यानातील खेळणी आणि व्यायामाची साधने मोडकळीस आली असून नाल्याशेजारील संरक्षक जाळ्या तुटल्याने उद्यानात येणाऱ्या लहानग्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील भीमनगर परिसरात दिवंगत संगीतकार श्रीनिवास खळे उद्यान आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने म्हाडा प्राधिकरणाच्या सहकार्याने हे उद्यान उभारल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील रहिवासी असलेले दिवंगत संगीतकार खळे यांचे नाव दिले असले, तरी या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेली स्व. खळे यांच्या नावाची पाटी तुटलेली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर नेहमीच वाहने पार्क केलेली असल्याने उद्यानात जायचे कसे, असा प्रश्‍न उद्यानात विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि बच्चे कंपनीला पडतो. 

या उद्यानातील खेळणी मोडकळीस आली असून काही खेळण्यांची तर पुरती वाताहत उडालेली आहे. बसण्याची आसने आणि खेळणीदेखील गायब असल्याने उद्यानात येणाऱ्या मुलांचा नेहमीच हिरमोड होतो. नाल्याशेजारील भूखंडावर वसलेल्या या उद्यानाच्या सुरक्षेसाठी सभोवताली संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. यातील काही संरक्षक जाळ्या गायब असल्याने कुणीही नाल्यात कोसळण्याचा धोका संभवतो. या उद्यानानजीक असलेल्या वस्तीमधील रहिवासी या संरक्षक जाळ्यांवर चक्क कपडे वाळत घालत असल्याने उद्यानाची पुरती रयाच गेली आहे. 

वर्तकनगर म्हाडा वसाहतीत एकूण पाच उद्याने आहेत. यातील एकाही उद्यानाचा नागरिकांना उपयोग होत नाही. वारंवार देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च दाखवला जातो. हा खर्च म्हाडा की ठाणे महापालिका करते, की स्थानिक आमदारांच्या निधीतून हा खर्च होतो, याची माहिती तक्रारी करूनही मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचे दावे करणाऱ्या ठाणे महापालिकेचे स्मार्टपणाचे दावे फोल ठरले आहेत. 
- संतोष निकम, समाजसेवक 

ठाणे महापालिकेने हे उद्यान विकसित केलेले असून उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहिले जाते. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी सविस्तर सांगू शकतील. तरीही उद्यानाबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. 
- डॉ. चारुशीला पंडित 
सहायक आयुक्त, वर्तकनगर प्रभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neglect to maintain the parks in Thane