नेरूळ ते मुंबई जलवाहतूक लांबणीवर !

ब्रह्मा चट्टे
रविवार, 24 जून 2018

नेरूळ जेट्टीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी दोन एजन्सींना 117 कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. हे काम 2018 अखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

- मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी सिडको 

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ ते मुंबई प्रवास 45 मिनिटांत पार करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न वर्षभरासाठी लांबणीवर पडले आहे. या प्रवासासाठी नेरूळ येथील खारफुटी क्षेत्रातील कामांना न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. 

राज्य सरकारने जून 2015मध्ये मुंबई ते नेरूळ व नेरूळ ते मांडवा या जलवाहतूक प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हा प्रकल्प महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी), मुंबई पोर्ट ट्रस्ट व सिडको यांच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमबीच्या हद्दीतील मांडवा जेट्टीचे व ब्रेक वॉटरचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. मांडवा येथून जलवाहतुकीसाठी टर्मिनल इमारत उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या माध्यमातून भाऊच्या धक्‍क्‍यावर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे, तर नेरूळ येथील कामाची जबाबदारी सिडकोवर आहे. 

नेरूळ येथे खारफुटी वनक्षेत्र व सीआरझेड-1, सीआरझेड-2 व सीआरझेड-4 या क्षेत्रात हा प्रकल्प असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व परवानग्या घेणे सिडकोला आवश्‍यक होते. नेरूळ जलवाहतूक टर्मिनलच्या बांधकामात अडसर ठरलेल्या खारफुटीच्या राखीव वनाचे स्थलांतर व टर्मिनलला मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाआड येणारी खारफुटी तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने सिडकोला दिली. त्यानंतर याबाबत झटपट हालचाली होऊन हा प्रकल्प कार्यान्वित व्हायला हवा होता; मात्र याबाबत कोणतीच हालचाल झाली नसल्याची माहिती सिडकोतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nerul to Mumbai Shuttle will late for work