मुंबईकरांची तहान भागवणार ''हे'' प्रकल्प! वाचा संपुर्ण बातमी

मुंबईकरांची तहान भागवणार ''हे'' प्रकल्प! वाचा संपुर्ण बातमी

मुंबई : मुंबईच्या एक कोटी तीस लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवणे मुंबई महापालिकेसाठी मोठे आव्हान आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविण्याचे नियोजन जलअभियंता विभागाने केले असून पुढील चार वर्षांत गारगाई आणि पिंजाळ अशी दोन धरणे बांधून पूर्ण करून मुंबईकरांची तहान भागवण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. नव्या सरकारने मुंबईतील पाणी प्रश्‍नाला प्राधान्य दिले असून पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

मध्य वैतरणा प्रकल्प 2014 मध्ये कार्यान्वित झाला. त्या प्रकल्पातून मुंबईला 455 दशलक्ष लिटर इतके पाणी मिळत आहे. वैतरणाच्या रूपाने सातवा प्रकल्प सुरू झाल्यानंतरही मुंबईला होणारा पाण्याचा पुरवठा पुरेसा पाऊस न झाल्यास कमी पडत आहे. सध्या मुंबईला 3900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आणखी तीन प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत. त्यात गारगाई प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केला जाईल, असा विश्‍वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ पिंजाळ प्रकल्प त्यापुढील दोन वर्षांत म्हणजेच 2025 पर्यंत मार्गी लावण्याचा पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीची मदत घेण्यात येणार आहे. गारगाई धरणातून दररोज 440 आणि पिंजाळ धरणातून 865 दशलक्ष लिटर इतके पाणी मुंबईला मिळणार आहेत. त्या पाठोपाठ दमणगंगा धरण 2021 ते 2030 असे नऊ वर्षांत पूर्ण केले जाईल, असे नियोजन जल अभियंता विभागाने केले आहे. दमणगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यातून 1583 दशलक्ष लिटर इतके पाणी मुंबईला मिळेल. राज्य सरकारच्या भातसा धरणाच्या क्षमतेखालोखाल महापालिकेचे दमणगंगा धरण असेल. 

वर्षभर लागते 14 लाख दशलक्ष लिटर पाणी 
मुंबईसाठी पावसाळा संपल्यापासून पुढील वर्षभरासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा करून ठेवावा लागतो. तरच मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरते. 2018 मध्ये पालिकेला पाणीटंचाई भासल्याने विहिरींची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. जलतरण तलावाच्या वापरावर बंदी आणण्यात आली होती. पंचतारांकित हॉटेलमधील पाणीवापरावरही मर्यादा आणण्यात आल्या होत्या. पावसाचे पाणी जास्तीत जास्त साठवणे, त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करणे आणि पाण्याच्या बाबतीत काटेकोरपणे नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी नव्या राज्य सरकारने पावले उचलली आहेत. 
 

असे असेल धोरण 

  • - झोपडपट्टीत दरडोई 45 लिटर आणि इमारतींमध्ये 135 लिटर पाणी देत असल्याचा दावा पालिका करते. पालिकेच्या मालकीची धरणांतील पाण्याची साठवण क्षमता सुमारे 15 लाख दशलक्ष लिटर आहे. 100 किमीपेक्षा लांब असलेल्या तलावातून मुंबईत पाणी आणले जाते. त्यावर विविध प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य केले जाते आणि त्यासाठी खूप खर्चही होतो. तरीही मुंबई महापालिका आपल्याला ते स्वस्त दारात उपलब्ध करून देते. 
  • - एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. मुंबईत शौचालय व बाथरूम आणि इतर वापरासाठी पिण्याचे पाणी वापरले जाते. सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी होते, असा प्रशासनाचा निष्कर्ष आहे. 
  • - ज्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा होतो तिथे पाण्याची फारच उधळपट्टी होते. पाण्याच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी पालिकेने नवीन धोरण आखले आहे. त्यात दरडोई 90 लिटर पाणी पालिकेकडून मिळणार आहे. 
  • - पिण्याव्यतिरिक्तच्या वापरासाठी 45 लिटर पाणी बोअरवेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पुनर्प्रक्रियेतून निर्माण करणे सोसायट्यांना आणि नव्या बांधकामांना बंधनकारक आहे. पाण्याचा पुनर्वापर करणेही सक्तीचे असेल. 
  • - अस्तित्वात असलेल्या अतिरिक्त जलजोडण्याही कमी करण्यात येणार आहेत. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे असे नवीन धोरण तयार केले आहे. त्यामुळे पाण्याच्या चंगळवादाला चाप बसेल, असा विश्‍वास जलअभियंता खात्याला वाटत आहे. 

गारगई धरणातील पाणी टनेलमार्गे मोडकसागरमध्ये आणले जाईल. तेथून ते भांडुप कॉम्पलेक्‍समध्ये जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. त्यासाठीची टनेलची कामे पूर्ण झाली आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ती कामे प्राधान्याने घेतली आहेत. टप्प्याटप्प्याने कामे प्राधान्याने मार्गी लागतील. 
- टी. व्ही. शहा, माजी जल अभियंता, मुंबई महापालिका          

 


दररोज मिळणारे पाणी (दशलक्ष लिटरमध्ये) 
- गारगाई: 440 
- पिंजाळ : 865 
- दमणगंगा: 1586 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com