नव्या सरकारने सामान्यांचा आवाज ऐकावा; भिमसागराची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • राज्यघटना आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी 
  • परळ निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार

मुंबई : नवे काय अन्‌ जुने काय, सगळी सरकारे सारखीच आहेत. दिवसाढवळ्या अनुसूचित समाजाच्या बांधवांवर अत्याचार होतात. सामान्य माणसांचा आवाज ऐकला जात नाही. त्यामुळे या नव्या सरकारने सामान्य माणसाचा आवाज ऐकावा, अशी प्रतिक्रिया चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेने दिली. 

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून जनसागर लोटला होता. यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व अनुयायी चैत्यभूमीवर नतमस्तक झाले. सर्वसामान्य जनतेचा आवाज कोणी ऐकत नाही. त्यामुळे राज्यातील नवीन महाविकास आघाडीच्या सरकाने तरी सामान्यांचा आवाज ऐकावा, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे बुलडाणा जिल्ह्यातील गव्हाण गावावरून आलेल्या बेबी साहेबराव सिरसाट यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापासूनच चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर येतो. ही परंपरा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला मिळत आहे. त्यामुळे गेल्या सरकारने इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अद्याप पूर्ण केले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे चैत्यभूमीवरील अभिवादनाची परंपरा पिढ्यान्‌‌‌ पिढ्या सुरू राहील, असे वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सुरेश मेश्राम यांनी सांगितले. 

एकाही सरकारने अनुसूचित समाजाच्या विकासाचे काम केले नाही. त्यामुळे समाजाच्या नेत्यांनीच दिल्ली गाठावी आणि समाजाच्या उद्धारासाठी काम करावे, असे कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक विठ्ठल महादेव कांबळे यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान 
राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी आदि उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new government should listen to the general public, chaitybhumi mumbai