esakal | नवी मुंबई पालिकेकडून आणखी सहा हजार खाटांसाठी निविदा
sakal

बोलून बातमी शोधा

corona beds

नवी मुंबई पालिकेकडून आणखी सहा हजार खाटांसाठी निविदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई पालिकेने ऑक्टोबर महिन्यात ही लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ११ हजार ५४२ विविध प्रकारच्या खाटा तयार ठेवल्या आहेत. यात ऐरोली व नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालये समर्पित कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली असून यात आयसीयू खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.

महापालिकेने आणखी सहा हजार खाटांचे नियोजन केले आहे. त्यासाठी पाम बीच मार्गावर दोन रिकाम्या इमारतीदेखील भाड्याने घेतल्या जाणार आहेत. बेलापूर येथे एका खासगी इमारतीत ४८५ खाटा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालिकेने दुसऱ्या लाटेसाठी खासगी रुग्णालयांतील खाटांचा ताबा घेतला होता. पालिका प्रशासनाच्या आदेशानेच खासगी रुग्णालयांतील खाटा भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत शहरात खासगी २,२४८ व पालिकेच्या ४,४५४ अशा एकूण ६,७०२ खाटांचे नियोजन होते.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने ६,७०२ खाटांबरोबरच ४,८४० खासगी खाटांची तयारी केली आहे. खासगी रुग्‍णालयांतील खाटा परिस्थितीनुसार ताब्यात घेतल्या जात असल्याने त्यांचा आकडा निश्चित नाही. महापालिकेकडे आजच्या घडीस ११,५४२ खाटा तयार आहेत. आणखी सहा हजार खाटांच्या तयारीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय ३२ टनांपेक्षा जास्त ऑक्सिजन साठा केला जाईल, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे.

अत्यवस्थ रुग्णांसाठी नेरूळ, ऐरोलीत व्यवस्था

गणेशोत्सवापर्यंत ४० रुग्‍णसंख्या असलेल्या नवी मुंबईत उत्‍सवानंतर वाढ होताना दिसत आहे. दररोज जवळपास ७५ नव्या रुग्‍णांची नोंद होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार, तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये अधिक वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पालिकेने डी. वाय. पाटील रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांसाठी व्यवस्थेसह वाशी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ७५ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. याशिवाय पालिका ऐरोली येथे १८७ व नेरूळ येथे २२० खाटा या केवळ अत्यवस्थ रुग्णांसाठी तयार केल्या जात आहेत.

loading image
go to top