
विरार : बोरिवलीच्या पुढे उत्तरेला पश्चिम रेल्वेवर वसई, नालासोपारा, विरार, केळवेे, सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू अशी लोकसंख्या वाढलेली शहरे उदयास येत आहेत. वसई, विरार, नालासोपारा या तीन रेल्वे स्थानक परिसरात स्थलांतरित लोकसंख्या वाढीने विक्रमी आकडा गाठला आहे. मुंबईत जाणारा सर्वात मोठा नोकरदार वर्ग याच भागात राहतो. या सर्व प्रवाशांना रोजचा रेल्वे प्रवास म्हणजे एक दु:स्वप्न ठरत आहे. कुटुंबाची जबाबदारी आणि जगण्याची मजबुरी यामुळे लोकांना या रेल्वे प्रवासातून सुटकाही नाही. आजचे मरण उद्यावर अशा पद्धतीने येथील प्रवासी रेल्वे प्रवास करताना दिसून येतात.