शीव स्मशानभूमीत नव्या दाहिन्या; कमी वेळेत आणि कमी सरणात होणार अंत्यसंस्कार 

समीर सुर्वे
Thursday, 3 September 2020

शीव येथील स्मशानभूमीत आता कमी सरणात आणि नेहमीपेक्षा निम्म्या वेळात मृतदेहांचे दहन होणार आहे. या स्मशानभूमीत नव्याने दोन दाहिन्या बसवण्यात आल्या असून अवघ्या 100 ते 125 किलो सरणात आणि दीड ते दोन तासात पार्थिवावर दहन करणे शक्‍य होणार आहे

मुंबई : शीव येथील स्मशानभूमीत आता कमी सरणात आणि नेहमीपेक्षा निम्म्या वेळात मृतदेहांचे दहन होणार आहे. या स्मशानभूमीत नव्याने दोन दाहिन्या बसवण्यात आल्या असून अवघ्या 100 ते 125 किलो सरणात आणि दीड ते दोन तासात पार्थिवावर दहन करणे शक्‍य होणार आहे. सध्या खुल्या पद्धतीने होणाऱ्या दहनात 400 किलो सरण लागत असून त्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. 

ड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमीत दर वर्षी 55 हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. त्यातील 45 हजार पार्थिवांचे पारंपरिक पद्धतीने, तर अवघ्या 10 हजार पार्थिवांचे अंत्यसंस्कार विद्युत किंवा गॅसदाहिनीत होते. 
प्रत्येक पार्थिवाच्या दहनासाठी 300 ते 400 किलो सरण लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. त्यावर मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून उपाय शोधत होती. त्यातून या बंदिस्त दाहिन्यांचा पर्याय पुढे आला आहे. विद्युत अथवा गॅस दाहिन्यात पार्थिव ट्रॉलीवरून दाहिनीत सरकवला जातो. त्याच पद्धतीने ही बंदिस्त दाहिनी असून त्यात सरण रचून अंत्यसंस्कार करता येतात. या बंदिस्त पद्धतीत मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन दाहिनीतील तापमान 850 ते 950 अंशापर्यंत जाते. त्यामुळे 100 ते 125 किलो सरणात दीड ते दोन तासांत पार्थिवाचे पूर्णपणे दहन केले जाते. शीव येथील स्मशानभूमीत या दाहिनी बसवण्यात आल्या असून त्यासाठी 98 लाख 88 हजार रुपये खर्च आला आहे. यात चिमणी, शेड तसेच तीन वर्षांची हमी समाविष्ट आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

प्रदूषणातही घट 
पारंपरिक पद्धतीने पार्थिवांचे दहन झाल्यास त्यातून 600 किलो हरितगृह वायू आणि मोठ्या प्रमाणात तरंगते धुलिकण निर्माण होतात. नव्या बंदिस्त दाहिनीत सरण कमी लागणार असून प्रदूषणाचे प्रमाण कमी होईलच. त्याबरोबर 90 ते 100 फूट उंचीच्या चिमणीतून हा धूर बाहेर सोडला जाणार आहे. त्याच वॉटर स्क्रबर बसविण्यात येणार असून ज्यामुळे धुळीचे कण आणि कार्बनडायऑक्‍साईडचे प्रमाणही कमी होईल.

----------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New right at Siva Cemetery; The funeral will be held in less time and in less time