नियमांचा भंग केल्यास होऊ शकते जेल, गणेश विसर्जनाचे नवीन नियम वाचलेत का ?

समीर सुर्वे
शुक्रवार, 31 जुलै 2020

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी यापुर्वी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये महानगरपालिकेने काही नवे नियम समाविष्ट केले आहेत.

मुंबई : सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी यापुर्वी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये महानगरपालिकेने काही नवे नियम समाविष्ट केले आहेत. यात, प्रतिबंधीत वस्त्या आणि सील केलेल्या इमारतींमध्ये असलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन त्याच ठिकाणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतर मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे असेही निर्देश महापालिकेने दिले आहेत.

नियमांचा भंग केला तर... 

नियमांचा भंग केल्यास साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 नुसार लागू असलेल्या नियमावलीचे पालन न झाल्यास शिक्षा भोगावी लागेल. या अंतर्गत वर्षभरापर्यंतची कैद होऊ शकते.

मुर्तीची उंची दोन फुटांपर्यंतच ठेवण्याचा नियम​...

राज्य सरकारने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने घरगुती गणेशोत्सवासाठी सुचना जाहीर करुन मुर्तीची उंची 2 फुटांपर्यंत ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र आता मुर्तीची उंची दोन फुटांपर्यंतच ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे.

मोठी बातमी - हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली 'ही' आनंदाची बातमी

कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी असं करावं विसर्जन... 

प्रतिबंधीत क्षेत्र, सील केलेल्या इमारतींमधील गणपती मुर्तीच्या विसर्जनाचाही पेच होता. त्यावरही मुंबई महानगरपालिकेने निर्देश दिले आहेत. यात, सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी मंडपातच लोखंडी टाकी ठेवून तेथेच विसर्जन करावे. तर, घरगुती गणपतीचे विसर्जन हे ड्रम किंवा बादलीत करणे बंधनकारक आहे. इतर मुर्तीचे विसर्जन जवळच्या कृत्रिम तलावतच करावे असेही नव्या नियमावलीत नमुद केलं आहे.

कृत्रिम तलावांची निर्मीती करावी...

सार्वजनिक मंडळाच्या जवळच कृत्रिम तलाव बांधण्यात यावेत. त्याचबरोबर विविध गणेशोत्सव मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी स्वयसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मीती करावी. त्यासाठी अर्ज आल्यास जुजबी पडताळणी करुन परवानगी द्यावी असे निर्देशही प्रशासनाकडून प्रभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

मोठी बातमी - सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?

विसर्जनाची आरती घरीच उरकुन घ्यावी...

मिरवणुक न काढता सार्वजनिक मंडळांसाठी 10 आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी 5 व्यक्तींची उपस्थीती बंधनकारक करण्यात आली. त्याच बरोबर विसर्जनाची आरती घरीच उरकुन घ्यावी. तसेच, इमारती, चाळीतील सर्व गणपती मुर्ती एकाच वेळी विसर्जनासाठी आणू नये.

हार प्रसादाची दुकानं नको...

सार्वजनिक मंडपाच्या परीसरात हार, फुले, प्रसाद विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येऊ नये. तसेच, साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजारा करताना चलचित्रांचे देखावे करुन नये. शक्‍यतो व्यावसायिक जाहीराती प्रदर्शित करुन आरोग्य विषयक जनजागृती करणारे फलक लावावे. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करावे.

भाविकांच्या दर्शनासाठी असं करू शकतात...

शक्‍यतो भाविकांना गणेश मुर्तीचे दर्शन ऑनलाईन, केबल टिव्ही वरुन होईल याची सोय करावी. दर्शनाला येणाऱ्या नागरीकांची संख्याही मर्यादित असावी. तसेच येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्कॅनिक बंधनकारक आहे.

( संकलन - सुमित बागुल )

new rules and regulations for ganesh immersion by bruhanmumbai municipal corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new rules and regulations for ganesh immersion by bruhanmumbai municipal corporation