New Year 2023 : गेट वे,चौपाट्यावरून सरत्या वर्षाला 'गुड बाय'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girgaum Chowpatty

New Year 2023 : गेट वे,चौपाट्यावरून सरत्या वर्षाला 'गुड बाय'!

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शनिवारी पूर्वसंध्येला मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटकांनी गर्दी केलेली होती.

तब्बल अडीच वर्ष वर्षांचा संकटांनंतर प्रथम इतकी गर्दी पाहायला मिळाली आहे. अनेकांनी या वर्षाला निरोप देत असताना 2022 चा शेवटचा सुर्यास्त आपल्या कॅमेरा कैद केला आहे...नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला.

मात्र,कोरोना प्रतिबंधामुळे गेली दोन वर्ष सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया भेट देऊन शकले नव्हते.

मात्र यंदा कोरोनाचे संपूर्ण निर्बंध हटवण्यात आल्याने नागरिकांनी पर्यटन स्थळी मोठी गर्दी बघायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारताचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतील गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होतं. तर गेट वे शेजारील ताज हॉटेलच्या इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. विशेष म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होते.

कोव्हीडमुळे सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष घरी राहून आनंद लुटला होता. मात्र, यंदा आम्ही २०२० ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मरीन ड्राईव्ह येऊन आनंद लुटला आहे.

-रुपेश गव्हाणे- भायखळा

प्रत्येक वर्षी आम्ही ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठीमरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी येत होतोय. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे आम्ही येऊ शकलो नाही. परंतु, यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मरीन ड्राईव्हला आलोय फार छान वाटते.

श्रद्धा नवले, बदलापूर

गेल्या वर्षी कोरोनामुळे पर्यटन स्थळावर नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे मला मरीन ड्राईव्हला येता आले नाही. पण यंदा कसली बंदी नसल्याने मरीन ड्राईव्हला आलो. आता नवीन वर्षाचे स्वागत करून रात्री घरी जाणार.

- राजेश शर्मा, अंधेरी