बाराच्या ठोक्याला नाही, यंदा नववर्षाचे स्वागत रात्री साडे दहा वाजताच

बाराच्या ठोक्याला नाही, यंदा नववर्षाचे स्वागत रात्री साडे दहा वाजताच

मुंबई, ता. 23 ः राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री 11 नंतर लादलेल्या संचारबंदीमुळे हॉटेलचालक गोंधळात पडले असून रात्री अकरानंतर कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी परत कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर हॉटेलचालक संघटनेने थायलँडच्या वेळेनुसार नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली आहे. 

इंग्लडमधील नव्या विषाणुमुळे रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे नाताळात किंवा वर्षअखेरीला हॉटेलात जेवणासाठी येणाऱ्यांची सर्वात जास्त पंचाईत होणार आहे. मोठ्या हॉटेलांमधील संगीत कार्यक्रम यंदा रद्द झाले आहेत. मात्र आता जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना रात्री अकरा वाजता हाताला धरून बाहेर काढावे का, असा प्रश्न हॉटेलचालकांना पडला आहे. 

त्यातच संचारबंदी असली तरी त्या काळात लोकांना अडवणार नाही, अटक करणार नाही, अशी विधाने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहेत. त्यामुळे या गोंधळात अजूनच भर पडल्याचे अंधेरीच्या (एमआयडीसी) रॅडिसन या आलिशान हॉटेलचे मुख्य संचालन अधिकारी मेहताब सिद्दिकी यांनी सांगितले. या गोंधळामुळे हॉटेलचालकांसमोर नवीच समस्या उभी राहिली आहे, एरवी आमच्या कर्मचाऱ्यांचे काम रात्री दहा वाजता संपते. मात्र शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचे काम अकरा वाजता संपले तरी त्यांना आवरायला बारा-एक वाजेलच. मग लांब राहणाऱ्यांनी घरी कसे जावे, असाही प्रश्न त्यांनी केला. 

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले ग्राहक रात्री अकरानंतर गेले नाहीत तर आम्ही काय करू. जरी ते घरी निघाले तरी संचारबंदीमुळे ते जाणार कसे. कर्मचाऱ्यांनी देखील हॉटेलातच झोपावे का. या गोंधळाबाबत सरकारने व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे. अन्यथा वर्षभर मोठा फटका बसलेल्या हॉटेल इंडस्ट्रीसमोरील अडचणीत आणखीनच वाढ होईल, असेही सिद्दिकी यांनी दाखवून दिले. मागीलवर्षी आम्ही सातशे ग्राहकांच्या उपस्थितीत पहाटेपर्यंत डिजे, संगीत असा जल्लोष केला होता. मात्र आता फक्त जेवणाचाच कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.

थायलँडमध्ये नेहमी नवीन वर्ष येते तेव्हा मुंबईत रात्रीचे साडेदहा वाजलेले असतात, यावेळेस मुंबईत रात्रीच्या संचारबंदीमुळे साडेदहा वाजताच नववर्ष साजरे करण्याचा निर्णय हॉटेल अँड अँड रेस्टोरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ने घेतला आहे. सरकारने योजलेले उपाय योग्यच आहे. मात्र संचारबंदीमुळे हॉटेलांवर वाईट परिणाम होईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले. 

अनलॉकिंगच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहोत, त्यामुळे सरकारने हॉटेलांची वेळ वाढवावी. कोरोनाच्या नव्या विषाणुच्या भीतीने सरकारने आता कठोर उपाययोजना केल्यास हॉटेल इंडस्ट्री आणखीनच संकटात सापडेल असं इंडियन हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशन अध्यक्ष  शिवानंद शेट्टी म्हणालेत. 

new years celebration will be done at half past ten decision by hotels owners in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com