esakal | NIAचे नवे महानिरीक्षक मनसुख हिरेनच्या घरी

बोलून बातमी शोधा

मनसुख हिरेन
NIAचे नवे महानिरीक्षक मनसुख हिरेनच्या घरी
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) पथकाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांच्या ठाण्यातील घरी सोमवारी भेट दिली. एनआयएचे नवे महानिरीक्षक ज्ञानेंद्र वर्मा यांनी मनसुख हिरेन हत्येचा आढावा घेण्यास सुरूवात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महानिरीक्षक ज्ञानेंद्र वर्मा यांनी पदभार स्विकारल्यानंतर आता मनसुख हिरेन गुन्ह्यांचा आढावा घेण्यात सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पथकासह विकास पाम सोसायटी येथील मनसुख हिरेन यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हिरेन कुटुंबियांशी गुन्ह्यांबाबत चर्चा केली. याप्रकरणानंतर दुस-यांदा एनआयएच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली आहे. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हे पथक दाखल झाले होते. यापूर्वी 11 मार्चला एनआयए पथकाने हिरेन यांच्या घरी भेट दिली होती.

मनसुख यांची पत्नी विमन हिरेन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भादंवि कलम 302, 201, 34 आणि 120(ब) अंतर्गत हत्या, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत 5 मार्चला सापडला होता. जेव्हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला तेव्हा त्यांच्या तोंडात 5 ते 6 रुमाल कोंबलेले होते. मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात रुतलेला होता. खाडीच्या बाजूला रेल्वे ब्रिजचे काम चालू आहे. या ब्रिजचे कामावरील सुपरवायझर वाघमारे नावाचे हे किनाऱ्यावर लघुशंका करण्यासाठी गेले असता त्यांना प्रथम हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली.