...वाशी ते घाटकोपर प्रवास गारेगार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

नवी मुंबईतून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांकरिता उपयोगी असा वाशी रेल्वेस्थानक ते घाटकोपर रेल्वेस्थानक (पश्‍चिम) अशा नवा वातानुकूलित बसमार्गाची सुरुवात प्रजासत्ताकदिनी करण्यात आली.

नवी मुंबई : नवी मुंबईतून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांकरिता उपयोगी असा वाशी रेल्वेस्थानक ते घाटकोपर रेल्वेस्थानक (पश्‍चिम) अशा नवा वातानुकूलित बसमार्गाची सुरुवात प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. महापौर जयवंत सुतार, पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी बसस्थानकात या सेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. 

ही बातमी वाचली का? जिओ ग्राहकांनो, थायलंडला जाण्यासाठी बॅगा भरा!

वातानुकूलित असा हा नवा बस मार्ग क्रमांक 127 वाशी रेल्वेस्थानकापासून कोपरखैरणे, एमबीपी महापे, घणसोली नाका, सेक्‍टर- 5 ऐरोली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली टोल नाका, भांडुप पंपिंग स्टेशन, टागोरनगर जंक्‍शन, गांधीनगर, हिंदुस्तान कंपनी, गोदरेज कंपनी, श्रेयस सिनेमा ते घाटकोपर रेल्वेस्थानक (प.) असा असणार आहे. साधारणत: 29 किमीचे हे अंतर पार करण्यासाठी 90 ते 100 मिनिटे इतका कालावधी अपेक्षित आहे. विशेषत्वाने या बसद्वारे मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना चांगली संलग्नता उपलब्ध होणार आहे. 127 क्रमांकाचा हा नवा बसमार्ग 62 वा असून, त्याचा शुभारंभ नव्या इंधनरहित इलेक्‍ट्रिकल बसेसमध्ये व व्होल्वो बसमध्ये करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बसचा काही अंतर प्रवासही केला. या वेळी पालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती शशिकला पाटील, नगरसेवक गणेश म्हात्रे, फशीबाई भगत, परिवहन समिती सदस्य ऍड. अब्दुल जब्बार खान, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, परिमंडळ उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीलेश नलावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? वसईकर समस्यांच्या दृष्टचक्रात

अशी असेल बसची वेळ 
सकाळ, संध्याकाळ 30 ते 40 मिनिटे अंतराने या बस उपलब्ध असणार आहे. वाशी रेल्वेस्थानकातून पहिली बस सकाळी 7 वाजता; तसेच शेवटची बस सायंकाळी 8.20 वाजता सुटणार आहे. घाटकोपर रेल्वेस्थानक (पश्‍चिम) येथून पहिली बस सकाळी 8.30 वा.; तसेच शेवटची बस सायंकाळी 10 वाजता सुटणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMMT air-conditioned bus route starts from Vashi to Ghatkopar