esakal | खालूबाज्याने दणाणली ही गावे 
sakal

बोलून बातमी शोधा

खालूबाज्याने दणाणली ही गावे 

खालूबाजा, लेझीमच्या तालावर त्या नाचत आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने "हे देवा महाराजा... होय महाराजा...' अशी गाऱ्हाणी ऐकू येऊ लागली आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिकही यानिमित्ताने गावात आले असल्याने ग्रामीण भाग गजबजला आहे. 

खालूबाज्याने दणाणली ही गावे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाड : होळीचा सण उत्साहात साजरा झाला. आता महाड तालुक्‍यात गाव- वाड्यांवरील घरोघरी ग्रामदेवतांच्या पालख्या येऊ लागल्या आहेत. खालूबाजा, लेझीमच्या तालावर त्या नाचत आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने "हे देवा महाराजा... होय महाराजा...' अशी गाऱ्हाणी ऐकू येऊ लागली आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिकही यानिमित्ताने गावात आले असल्याने ग्रामीण भाग गजबजला आहे. 

धक्कादायक : खेळत होती चिमुकली...अचानक असे घडले...

शिमगा म्हटला की कोकणात ग्रामदेवतेचा उत्सव सुरू होतो. प्रत्येक गावानुसार या उत्सवाच्या आगळ्या-वेगळ्या प्रथा आहेत. मुख्य होळी लावण्याआधी गावा-गावात आठ-नऊ दिवस होळ्या पेटवल्या जातात. शेवटच्या दहाव्या दिवशी होम हा मुख्य शिमगा असतो. यादरम्यान पालखीत देवतेची रूपे लावली जातात. 
शिमगोत्सवात खास आकर्षण असते ते देवाच्या पालखीचे आणि रूपे लावण्याच्या कार्यक्रमाचे. देव-देवतांचा आकर्षक असा मुखवटा या पालखीत स्थानापन्न केला जातो. तसेच देवाला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. त्यानंतर पालखी सहाणेवर नेली जाते. मुख्य शिमगोत्सवानंतर पालखी सहाणेवरच वास्तव्य करते. त्या कालावधीत पूजा, गोंधळ असे परंपरेचे कार्यक्रम होतात. नंतर पालखी दर्शनासाठी घरोघरी नेण्याची परंपरा आहे. आता घरोघरी पालख्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. 

हे वाचा : दीक्षाभूमीचा सजग प्रहरी...
परगावी असलेले नोकरदार, व्यावसायिक देवदर्शनासाठी गावी आल्याने घरे गजबजलेली आहेत. मानकऱ्यांच्या घरी पहिली पालखी ठेवली जाते. तिथून ती प्रत्येक घरी जाते. त्यावेळी सुहासिनी देवतांची खणा-नारळाने ओट्या भरतात. ओटी भरणाऱ्या कुटुंबाचे नाव घेतले जाते. "हे महाराजा, होय महाराजा, वर्षाची ओटी भरली जातेय, त्यांच्या पोराबालास सुखी ठेव, नीट सांभाळ, इडापिडी टळू दे, लगन जुळू दे, शिक्षणात यश दे', असे गाऱ्हाणे मांडले जाते. ढोल व ताशांच्या वाद्यात पालखी संपूर्ण गाव फिरते. 
......... 
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा 
गावातील मध्यवर्ती भागात अन्यथा मंदिराजवळ पालखी नाचवली जाते. तालुक्‍यात आता पालख्या बाहेर पडल्या आहेत. काही ठिकाणी देवळात अथवा सहाणेवर पालखी ठेवली जाते. तेथे देवतांचे दर्शन घेतले जाते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा अपूर्व सोहळा कोणीही चुकवत नाही.